नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा बुधवारी थंडावल्या. मध्य प्रदेश विधानसभेसह छत्तीसगढ विधानसभेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबर रोज मतदान होत आहे. त्यासाठीचा प्रचार सायंकाळी सहा वाजता थंडावला. त्यानंतर उमेदवारांना केवळ घरोघरी प्रचार करण्याची परवानगी आहे. 17 नोव्हेंबर रोजी राज्यातील 64 हजार 523 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यावेळी राज्यात एकूण 2 हजार 533 उमेदवार रिंगणात आहेत. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 533 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 2 हजार 280 पुरुष उमेदवार, 252 महिला उमेदवार आणि एक ट्रान्सजेंडर उमेदवार आहे. भाजपकडून एकूण 230 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 203 पुरुष आणि 27 महिला उमेदवार आहेत. काँग्रेसच्या 230 उमेदवारांपैकी 200 पुरुष आणि 30 महिला उमेदवार आहेत. एकूण अपक्ष उमेदवारांची संख्या 1 हजार 166 आहे. यामध्ये 1078 पुरुष आणि 88 महिला उमेदवार आहेत.
छत्तीसगढ विधानसभा – दुसऱ्या टप्प्याचे मतदान
छत्तीसगढ विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाचा प्रचारही १५ नोव्हेंबर रोजी थंडावला आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील 70 विधानसभा मतदारसंघात एकूण 958 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत, त्यापैकी 827 पुरुष, 130 महिला आणि एक तृतीय लिंगाचा उमेदवार आहे. मतदानादरम्यान राज्यातील एक कोटी ६३ लाख १४ हजार ४७९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.