राजदीप सरदेसाईंचा अजब तर्क! म्हणाले, "इंग्रजी बोलतात म्हणून महुआ मोईत्रा टार्गेट"

13 Nov 2023 16:09:45

Rajdeep Sardesai


मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा चर्चेत आहेत. आता पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांच्याविषयी एक वक्तव्य केले आहे. महुआ मोईत्रा या इंग्रजी बोलत असल्याने त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे राजदीप सरदेसाई यांनी म्हटले आहे.
 
राजदीप सरदेसाई हे कायम त्यांच्या उलटसुलट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा महुआ मोईत्रांविषयी हे वक्तव्य केले आहे. ११ नोव्हेंबर रोजी त्यांनी एका व्हिडीओमध्ये हा दावा केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
 
राजदीप सरदेसाई म्हणाले की, “आधी राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द होणे आणि आता महुआ मोईत्रा यांच्यावरील कारवाई. यातून काही मेसेज दिला जात आहे का? तसे असेल तर मग अशा प्रकारचे मेसेज कोण देत आहेत? असे त्यांनी म्हटले आहे. तसेच महुआ मोईत्रांना केवळ त्या इंग्रजी बोलत असल्यामुळे लक्ष्य केले जात आहे का? त्यामुळे लवकरच त्यांचे अनेक शत्रू तयार झाले आहेत का? एकदा याचा विचार करा असेही त्यांनी म्हटले आहे.
 
यासोबतच राहूल गांधींनंतर महुआ मोईत्रा या एकमेव अशा व्यक्ती आहेत ज्यांनी अदानी समूहावर तथ्यांसह प्रश्न उपस्थित केला आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, महुआ मोइत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे.



Powered By Sangraha 9.0