जगा आणि जगू द्या!

    13-Nov-2023
Total Views |
Metropolitan Cities Air Pollution During Diwali Festival

मुंबई आणि परिसरात फटाके फोडण्यासाठी न्यायालयाने दोन तासांची कालमर्यादा निश्चित जरुर केली होती. मात्र, दुर्दैवाने त्याचे पालन झाले नाही, हे वास्तव. पण, यामागचे नेमके कारण काय? तर काही नागरिकांची आत्मकेंद्री, कुटुंबकेंद्री आणि उत्सवकेंद्री वृत्ती! ‘मी आणि माझे’ अशा या स्वार्थी वृत्तीमुळे ‘राष्ट्र प्रथम’, ‘सामाजिक जबाबदारी’ यांचे भान अशा मंडळींना केवळ बौद्धिक बडबड वाटते. म्हणूनच अशा मंडळींनी त्यांच्या या समाजघातक मानसिकतेचा त्याग करायलाच हवा. त्यासाठीच जगा आणि जगू द्या, हेच सूत्र समाजहिताचे ठरावे!

महाराष्ट्रातील राजकारणी नेतेमंडळींनी ‘प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प’ अभियान साजरे केले. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथही घेतली. या उपक्रमांचा उद्देश हाच की, आधीच खालावलेला मुंबई आणि महाराष्ट्राच्या शहरांमधील हवेचा दर्जा आणखीन गंभीर स्थितीत पोहोचू नये. याचा विशेषत्वाने परिचय दिल्लीतही आला. दिल्ली सरकारने सोमवारीच राजधानी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वापरावर पुन्हा बंदी लादण्याची घोषणा केली. प्रदूषण पातळीला आळा घालण्याच्या कृती योजनेचा एक भाग म्हणून अनेक राज्यांमध्ये हे पाऊल उचलण्यात आले.

शाळकरी मुलांसह सर्वांना ’दीपोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केले आणि त्यावेळी सर्वांना ही विनंतीदेखील केली की, शहरात फटाके फोडू नयेत. शहराला वायू प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पातळीच्या समस्येला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात असताना, साहजिकच मुख्य चिंता आता फटाक्यांमुळे उद्भवते. त्यामुळे नागरिकांनी आपल्याच आरोग्यासाठी फटाके फोडणे टाळले, तर दिवाळीनंतर हवेतील प्रदूषणाची पातळी कमी ठेवण्यात शहराला यश येईल. पण, दुर्देवाने या सगळ्याची पुरेपूर कल्पना असूनही काही अतिउत्साही नागरिकांनी रात्री २ वाजेपर्यंत दणक्यात फटाके वाजवले.

आजकाल दिवाळी साजरी करायची म्हणजे फटाके हे केंद्रस्थानी आलेले दिसतात. फटाक्यांचा खरे तर सण किंवा हिंदू धर्माशी फारसा पारंपरिक संबंध नसला तरी, आपल्यापैकी बहुतेकांना वाटते की, फटाक्यांशिवाय काही लक्ष्मीपूजन, चोपडापूजन व धनत्रयोदशी किंवा चार दिवसांची दिवाळी साजरीच होत नाही आणि त्यांच्यावर बंदी घालणे हा आपल्या धर्मावरील एकप्रकारचा हल्ला आहे. खरं तर, जर तुम्ही त्यांच्याशी पर्यावरणाबद्दल बोललात, तर त्यातील काही मुद्दाम अधिक फटाके लावतील. प्रौढांमधील या बालिशपणावर उपाय नाहीच. अशीच घटना आणि प्रसंग जीवघेण्या कोरोनाच्या काळात ’क्वारंटाईन’, ’आयसोलेशन’ आणि ’सोशल डिस्टन्सिंग’बाबतही घडला. कोरोना प्रतिबंधक नियम सांभाळण्यात इतके गोंधळ काहींनी घातले की, पोलिसांना आणि सरकारला डोळ्यात तेल घालून जनतेला अधिकाराने नियंत्रणात ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.

प्राचीन भारतीय शहाणपण आपल्याला सदैव शिकवत आले आहे की, आपली पहिली जबाबदारी देशाप्रती आहे, दुसरी जबाबदारी आपल्या कुटुंबाची आणि सर्वात शेवटी तिसरी जबाबदारी स्वतःची. मात्र, ही परंपरा उलटी झाली की त्या समाजाचे अध:पतन सुरू होते. (कदाचित तेच आता घडत आहे.) सामाजिक जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य असायला पाहिजे. समाजव्यवस्था गुंड-बदमाशांच्या कारवायांमुळे नाही, तर सुजाण लोकांच्या निष्क्रियतेने नष्ट होते. किती हा विरोधाभास! जर उत्तम नागरिक निष्क्रिय राहून विनाश सहन करू शकतात, तर प्रश्न असा आहे की, ते त्यांची सामाजिक जबाबदारी प्रगल्भतेने व जबाबदारीने खरोखरच पार पाडत आहेत का?

प्रत्येक मनुष्याच्या निश्चितच काही दैनंदिन गरजा आहेत. आपल्या त्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण इतरांवर अवलंबून असतो. तसेच इतरही त्यांचे काम (गरजा आणि इच्छा) समाधानकारकपणे पूर्ण करण्यासाठी आपल्यावर अवलंबून असतात. हे तथ्य आपण महामारीच्या काळात अनुभवले. जोपर्यंत आपण एकमेकाला साहाय्य करत नाही, तोपर्यंत ‘अवघे धरू सुपंथ’ होणार नाही. शिवाय व्यक्ती एक कुटुंब बनवते, कुटुंब स्वतःला समाज बनवते, समाज राष्ट्र निर्माण करतो. राष्ट्र एकत्रित होऊन जग बनते. प्रत्येक व्यक्तीसाठी शक्य तितक्या प्रमाणात, सामाजिकरित्या जबाबदार असणे म्हणजे शेजारी, मित्र, अगदी शत्रू यांच्यासाठी सद्गुणी क्रियाकलाप करणे.

समाज सुदृढ आणि विकासाभिमुख करायचा असेल, तर समाजातील प्रचलित विघातक प्रथा नष्ट कराव्या लागतील आणि प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. म्हणजे इतरांकडून जशी वागणूक आपल्याला अपेक्षित आहे, तशीच वागणूक दुसर्‍यास देण्यावर तुमचा विश्वास असायला हवा. इतरांसाठी चांगले करणे नैसर्गिकरित्या आले पाहिजे. परंतु, आज जगात असे लोक आहेत जे फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करतात. पण, सामाजिक जबाबदारीचा अर्थ असा आहे की, व्यक्ती आणि कंपन्यांचे कर्तव्य आहे की, त्यांनी त्यांच्या पर्यावरणाच्या आणि संपूर्ण समाजाच्या हितासाठी कार्य करणे. जेव्हा सुजाण नागरिक समाजाच्या नियमांचा गैरवापर करण्याऐवजी आणि त्यांच्या कमतरतांमुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून, सामाजिकरित्या जबाबदार असतात तेव्हा जीवन सोपे होते.

पण, त्यासाठी आधी सार्वजनिक जीवनात शिस्त पाळली पाहिजे. वाहतुकीचे नियम गांभीर्याने पाळले पाहिजेत. समाजात संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य, वक्तव्यही आपण करू नये. जे हक्क आपल्याला स्वतःसाठी हवे आहेत, ते आपण इतरांनाही दिले पाहिजेत. समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक अशा व्यक्ती आहेत, जे त्यांच्या संपूर्ण समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सक्रियपणे कार्य करतात. ते स्वयंसेवक सामाजिक न्याय, पर्यावरणीय स्थिरता आणि इतर महत्त्वाच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने गुंतलेले असतात. ते नैतिक आणि जागरूक ग्राहक निवडी करण्याकरिता झटत असतात आणि स्वतःला आणि इतरांना त्यांच्या सामाजिक कृतींसाठी जबाबदार मानतात.

एकूणच काय तर आपण या जगात एकटे राहत नाही. आपल्याला एकमेकांच्या साथीची व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे. प्रश्न केवळ दिवाळीत फटाके फोडायचे की नाही, एवढ्यापुरता मर्यादित नाही. आपले जीवन जगताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे की, आपल्या वागण्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे इतरांच्या जीवनात व जगात त्रास होणार नाही. जगा आणि इतरांना जगू द्या!

डॉ. शुभांगी पारकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.