मुंबई : पाकिस्तानातील कराचीमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले आहे. मौलाना तारिक रहिमुल्ला तारिक असे मृत दहशतवाद्याचे नाव असून तो जैशचा संस्थापक मसूद अझहरच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
रविवार १२ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून घटनेच्या वेळी मौलाना तारिक भारतविरोधी रॅलीत सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पाकिस्तानी पोलीसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कराचीच्या ओरंगी टाऊन भागात घडली आहे.
रविवारी याठिकाणी काही भारतविरोधी कट्टरपंथीयांनी रॅली काढण्याची घोषणा केली होती. या रॅलीमध्ये मौलाना रहिमुल्ला तारिक याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. रॅलीमध्ये हजारों भारतविरोधी लोकांची गर्दी होती. मौलाना तारिक रहीम उल्लाह रॅलीमध्ये सहभागी होताच त्याच्यावर जमावातील एका अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडल्या.
गोळीबारामुळे रॅलीमध्ये गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मौलाना तारिकला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी तपास सुरु असून अद्याप कोणालाच अटक करण्यात आलेली नाही.