मुंबई (दिपक वागळे) : मुंबईत दीपावलीचा जल्लोष साजरा करण्यासाठी मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले असून मुंबईच्या हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा २८८ पर्यंत जाऊन पोहचला. जो खराब म्हणून गणला जातो. यामुळे ॲलर्जी, दमा आदीसारख्या आजारांशी संबंधित रुग्णांत श्वासोच्छवास तसेच खोकल्याचा समस्यात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे.
वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. आठवडाभरापूर्वी मुंबईची खालावत चाललेली हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आणि त्या अनुषंगाने कार्यवाहीही सुरू केली गेली. स्वतः मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी वायू प्रदूषणाला आळा बसावा म्हणून नागरिकांना त्याचबरोबर सर्व बांधकाम आस्थापना आणि संबधित विभागांना पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन केले होते. महापालिकेच्या पर्यावरण संबंधित विभागाने सुरू केलेल्या विविध उपाययोजनांमुळे तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी मध्यम स्थितीवर आली असतानाच दिपावलीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात फोडल्या गेलेल्या फटाक्यांमुळे पुन्हा एकदा खराब झाली आहे.
मुंबईत रविवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. सुमारे १५० कोटी रुपयांचे फटाके मुंबईकरांनी रविवारी फोडले. फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र, ही वेळ उलटूनदेखील रात्री १२ वाजेपर्यंत फटाके वाजवणे सुरूच होते. काही उत्साही नागरिकांनी सायंकाळपासूनच फटाके फोडायला सुरू केले. यामुळे मुंबईसह उपनगरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ दिसून येतं आहे, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.
दरम्यान, रविवारी काही परिसरातील हावा गुणवत्ता पातळीत वाढ झाली असली तरी सायंकाळपर्यंत एकंदर मुंबईची हवेची गुणवत्ता सायंकाळी ५ वाजेपर्यंत १९३ म्हणजेच मध्यम स्थितीत होती.