वंचितांच्या जीवनात उजळला आनंदाचा दीप!; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी साजरी केली ‘पालावरची दिवाळी’

    13-Nov-2023
Total Views |
BJP State President Chandrashekhar Bawankule

महाराष्ट्र :
दिवाळीच्या दिवशी आसपासच्या गावात फिरून लहान सहान वस्तू विकून हाती आलेल्या पैशांत सण साजारा करण्यासाठी धडपडणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील कुहीनजीक ससेगावच्या गोपाळा वस्तीमध्ये यंदाची दिवाळी फटाके अन् मिठाईने साजरी झाली. वंचितांच्या जीवनात आनंदाचा दीप उजाळणारा हा क्षण ठरला.

भाजपच्या ‘पालावरची दिवाळी’ हा उपक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहकुटुंब सहभागी झाले. त्यांनीही ससेगाव तांड्यावरच्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मिठाई भरविली. या उपक्रमामुळे कुही तालुक्यातील ससेगाव शिवारात ‘गोपाळा वस्ती’मध्ये दिवाळीचे मिष्ठान्न अन् सन्मानाची आतषबाजीही झाली.

राज्यभरातील हजारो तांडे आणि गरिबांच्या वस्त्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीत आनंदाचा दीप लावण्याचा संकल्प केला आहे, भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून या उपक्रमात सहभागी झालो. वंचितांच्या चेहऱ्यावर फुलणारे समाधानाचे स्मित दिवाळीच्या आनंदात कितीतरी पट भर घालणारे होते, असे यावेळी बावनकुळे म्हणाले.

दिवाळी सारख्या सणापासून दूर राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या जीवानत आनंद निर्माण करण्यासाठी भाजपतर्फे एक दिवा वंचितासाठी प्रत्येक पालवर लावण्याचा निश्चय केला. यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. पालावरची दिवाळी हा राजकीय कार्यक्रम नसून वंचित समाजाचे भाजपा कार्यकर्त्यांसोबत असणारे भावनिक नाते जपणारा हा सोहळा ठरला.

बावनकुळे यांनी प्रत्येक घरी पोहचून फराळ, धान्य, कपडे व मिठाईचे वाटप केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ज्योती, मुलगा संकेत यांच्यासह माजी आमदार सुधीर पारवे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, जि.प. सदस्या प्रमिला दंडारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष फुटाने, कार्याध्यक्ष रोहित पारवे, कुही तालुकाध्यक्ष वामन श्रीरामे, उमरेड तालुकाध्यक्ष महेश दिवसे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

त्या आईच्या डोळ्यात तरले आनंदाश्रू

तांड्यावरच्या एका पालासमोर पलंगावर एक तान्हुली झोपली होती तर तिची आई घरातील कामात गुंतली होती. बावनकुळे पत्नी ज्योतीसह त्यांच्या घरी पोहचले व थेट पलंगावर जाऊन त्या तान्हुलीशी खेळू लागले. जवळ बसल्याने त्या तान्हुलीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले व ती हात पाय हलवू लागली. हे पाहताच तिची आई जवळ आली. तान्हुलीला बावनकुळे यांच्याकडून दिवाळीची भेट मिळताच तिच्या आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.