पराकाष्टेची ‘ज्योती’

    13-Nov-2023
Total Views |
Article on Jyoti Awhad

सिन्नरसारख्या ग्रामीण भागात खासगी शिकवणी वर्ग न लावता भटक्या-विमुक्त जमाती प्रवर्गातून राज्यातून तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवलेल्या ज्योती आव्हाड यांच्याविषयी...

शासनामार्फत होणार्‍या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आज ग्रामीण भागातील अनेक होतकरू तरुण-तरुणी मेहनतीच्या अन् चिकाटीच्या जोरावर यश संपादन करताना दिसतात. यात बहुतांश युवा कुठलाही खासगी शिकवणी वर्ग न लावता केवळ स्वयं अध्ययनाच्या माध्यमातून परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची किमया साधत आहेत.

नुकतीच ’महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या मंत्रालयीन लिपीकपदाची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. यात नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या ज्योती अंबादास आव्हाड या तरुणीने घवघवीत यश संपादन करून ग्रामीण भागातील मुलींसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विशेष बाब म्हणजे, भटक्या विमुक्त जमाती (ST) या प्रवर्गातून त्यांनी राज्यातून तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.
 
’महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’कडून वेळोवेळी अनेक स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. या स्पर्धा परीक्षांसाठी अगदी झपाटून तरूण-तरुणी परीक्षाही देतात. मात्र, काहींना एक-दोन वर्षांत यश मिळते, तर काही तरुणांना अनेक वर्षं अभ्यास करूनही यशाला गवसणी घालता येत नाही, तर काही वयोमर्यादेच्या निकषामुळे या स्पर्धेतून आपसुक बाद होतात. मात्र, काही युवा अजिबात निराश न होता, यशाचा पल्ला गाठतात.

चापडगाव हा परिसर डोंगराळ असून, येथील बहुतांश कुटुंब शेती व्यवसायावर आपला गुजराण करतात. ज्योती यांचे वडील अंबादास आव्हाड हे शेतकरी, तर आई अलका आव्हाड गृहिणी. ज्योती यांनी प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत घेऊन, दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण जवळच असलेल्या दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले. त्यानंतर बारावी व पदवीचे शिक्षण सिन्नर येथील जीएमडी महाविद्यालयात घेतले.

कला शाखेत शेवटच्या वर्षात पदवी शिक्षण घेत असतानाच, ज्योतीने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन ’महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यानंतर तब्बल चार वर्षे ज्योती यांनी कोणताही क्लास न लावता, केवळ स्वयं अध्ययनाच्या जोरावर परीक्षेची तयारी केली. २०२२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात ’लोकसेवा आयोगा’ची जाहिरात आल्यानंतर पहिली परीक्षा दिली. त्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ज्योती यांनी मुख्य परीक्षेची तयारी करत, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्य परीक्षादेखील उत्तीर्ण केली.

दरम्यान, या निकालानंतर ज्योती यांची मुंबई मंत्रालयात लिपीक म्हणून निवड झाली आहे, ज्याचे नवीन नाव ’महसूल साहाय्यक’ म्हणून बदलण्यात आले आहे. याविषयी बोलताना ज्योती म्हणाल्या की, “पदवीचे शिक्षण घेत असताना, स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली. आमच्या परिसरातील एक मुलगी ‘आरटीओ’ परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मलाही कुठेतरी वाटलं, आपणही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होऊ, त्यानुसार शिस्तबद्ध अभ्यासाला सुरुवात केली.” मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे खासगी शिकवणीवर्ग लावणे ज्योती यांना शक्य झाले नाही. यादरम्यान नाशिक रोड येथील अटल ज्ञान संकुल येथे अभ्यास केला. मात्र स्वतःवर विश्वास होता, त्यामुळे स्वयं अध्ययनावर भर दिला.
 
जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एका युवतीने अवघड परीक्षेत यश साध्य करणे, ही खरोखरीच कौतुकास्पद बाब. डोंगराळ परिसरात राहणार्‍या ज्योती यांनी स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे.

ज्योती यांना शिक्षणासाठी आई-वडिलांचा प्रारंभीपासूनच पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे या प्रवासात ज्योती यांना कुटुंबाची अनमोल साथ मिळाली. तसेच स्पर्धा परीक्षेच्या काळात विविध विषयांवर शिक्षकांचे महत्त्वाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सखोल अभ्यास करत असताना, अनेक नवनवे पैलू त्यांच्या लक्षात येत गेले, यासाठी शिक्षकांसह अनेक मित्र- मैत्रिणींचे मार्गदर्शनदेखील मोलाचे ठरल्याचे ज्योती सांगतात.

आजही ग्रामीण भागातील अनेक तरूण- तरुणी मोठ्या जिद्दीने परिस्थितीचा आव न आणता, स्पर्धा परीक्षेच्या शर्यतीत स्वत:ला झोकून देतात. यात सातत्य असणे आवश्यक असते. म्हणूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयं अध्ययन, जिद्द, काहीतरी करण्याची उमेद बाळगून अभ्यास करावा, यश नक्कीच पदरात पडते. मात्र, कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना प्रत्येक उमेदवाराचा ’प्लॅन बी’ जरूर तयार असावा. उमेदवाराने जास्तीत जास्त पाच वर्षं स्पर्धा परीक्षांना देऊन, त्यात झोकून द्यावे. मेहनत अगदी प्रामाणिकपणे केल्यास पाच वर्षांत स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणे सहज शक्य आहे.

परंतु, कोणत्याही कारणास्तव पाच वर्षांत स्पर्धा परीक्षांमध्ये अपशय आल्यास उमेदवाराने निराश न होता, ’प्लॅन बी’कडे वळावे. कारण, उमेदीचा काळ निघत जाऊन अपेक्षांचे ओझे दिवसेंदिवस वाढत असते. अशात पुन्हा सुरुवात करणे काहीसे अवघड होऊन बसते. यात योग्य मार्ग मिळाला तर ठीक; अन्यथा नैराश्य मनात घर करायला सुरुवात करते. म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ’प्लॅन बी’ जरून तयार ठेवण्याचा सल्ला ज्योती आवर्जून देतात. ज्योती आव्हाड यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!

गौरव परदेशी
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.