नवी दिल्ली : अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या चेहरा मॉर्फ करून डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळाली. यात काहीजणांनी संताप देखील व्यक्त केला. खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली होती. तसेच, अनेक सेलिब्रिटींनी सदर प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली होती.
दरम्यान, अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या डीपफेक व्हिडिओप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे. तसेच, दिल्ली सायबर क्राईम युनिट स्पेशल सेलचे पोलिस उपायुक्त डॉ. हेमंत तिवारी यांनी सांगितले की, तपासासाठी विशेष टीम तयार करण्यात आली असून यासंदर्भात योग्य ती चौकशी केली जाईल. तसेच, दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
तसेच, दिल्ली पोलिसांनी डीपफेक व्हिडीओप्रकरणी कारवाईस सुरूवात केली असून ज्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याची लिंक पोलिसांनी मेटाकडून मागविली असून तसेच, हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांची माहितीही देण्यास सांगितले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिल्ली महिला आयोगाच्या निर्देशानंतर एफआयआर दाखल केली आहे. दरम्यान, या व्हिडीओवर अभिनेत्री रश्मिकाने चिंता व्यक्त केली आहे.