पाटणा : देशभरात विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले लोक दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या घरी जात आहेत. त्यामुळे बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान, गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी बिहारमधील छपराकडे जाणारी ताप्ती गंगा एक्स्प्रेस गाडी स्थानकावर येताच प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये बिहारमधील एकाचा मृत्यू झाला तर, अनेक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या प्रवाशाचे नाव वीरेंद्र कुमार असे आहे. तो बिहारच्या छपरा येथील रहिवासी असून सुरतमध्ये कामाला होता. याशिवाय या दुर्घटनेत चार ते पाच जण बेशुद्ध पडल्याचेही सांगण्यात येत आहे.
रेल्वे स्थानकावर गर्दी होऊन कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना घडू नये यासाठी सुरत स्थानकावर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा सण-उत्सवांचे दिवस असल्याने गर्दी वाढत आहे. यातच आता ही दुर्घटना घडली आहे.