फुसका बार आला, पण वाजलाच नाही...मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

12 Nov 2023 18:25:00
CM Shinde on Uddhav Thackeray

ठाणे :
दिवाळी सुरू झाली, काल एक फुसका बार आला पण, वाजलाच नाही. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यूटर्न घ्यावा लागला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाना भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजकिय फटाकेबाजी केली.

मागील वर्षी देखील मोठ्या उत्साहात दिवाळी पहाट साजरी झाली. आपले सरकार आल्यानंतर सर्व सणांवरील निर्बंध काढून मोठ्या उत्साहात सण साजरे करण्यास सुरुवात केली. तसेच हिंदू सण असेच साजरे होत राहतील.असे स्पष्ट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रा दौऱ्यावर प्रत्युत्तर दिले. काल दिवाळी सूरू झाली, फुसका बार आला पण, वाजलाच नाही. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यूटर्न घ्यावा लागला.

दिवाळीच्या सणामध्ये अशा प्रकारे विघ्न घालायला कुठल्याही राजकीय नेत्याने येण्याचे चुकीचे आहे. असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.समोरून अनेक मोठे नेते आले होते. पण जनतेसमोर कोणाचेही काहीच चालत नाही. या सर्व लोकांचा माज जनता येत्या निवडणुकीत उतरवेल. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आरोप करणाऱ्यांना, माज करणाऱ्यांना जनतेने ७ व्या नंबरवर पाठवले. उद्या त्यांचा १० वा नंबरसुद्धा लागू शकतो, अशा शब्दात त्यांनी ठाकरे यांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्र्यानी चाखला मिसळचा आस्वाद

शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळचा आस्वाद घेतला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, मा.आमदार रवींद्र फाटक, मा.महापौर नरेश म्हस्के तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यानी मिसळपावचे बिल देखील अदा केले.
Powered By Sangraha 9.0