ग्रामदेवता घंटाळी देवी मंदिर आता हिंदु जागृती न्यासकडे

    11-Nov-2023
Total Views |
Gramdevta Ghantali Devi Temple

ठाणे :
धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील २५० वर्षे प्राचीन व स्वयंभू घंटाळी देवीची मंदिर वास्तूचे खरेदीखत व बक्षिसपत्राने मंदिराच्या सध्याच्या वारसदारांनी हिंदू जागृती न्यासकडे ट्रस्टच्या सर्व कायदेशीर बाजू पूर्ण करून हवाली केले. या शुभकार्यावेळी आसित झावबा, स्वाती विजयकर , मोहनाताई धैर्यवान व अलकनंदा कोठारे अशा चार वारसदारांचा अतिशय हृद्य असा सत्कार विश्वस्तांच्या हस्ते घंटाळी देवी मंदिरात करून त्यांना देवीचा प्रसाद म्हणून महावस्त्र देण्यात आले.

ठाणे व पालघर जिल्ह्यात गेली ३३ वर्षे सामाजिक व सांस्कृतिक कार्य करणाऱ्या हिंदु जागृती न्यास कडे ठाण्याची ग्रामदेवता घंटाळी देवी मंदिराच्या व्यवस्थापनाची धुरा सोपवली होती. त्यानंतर वर्षभरातच धनत्रयोदशी दिनी हिंदु जागृती न्यास कडे घंटाळी मंदिराच्या संपूर्ण जागेचे हस्तांतरण करण्यात आले. घंटाळी मंदिर हे ठाण्यातील सामाजिक , सांस्कृतिक व धार्मिक गतिविधींचे केंद्र करून सदभाव प्रसार व सदभाव वर्धनाचे कार्य वर्धिष्णू करण्याचा संकल्प या प्रसंगी करण्यात आला.

यावेळी माजी खासदार संजीव नाईक,आ.संजय केळकर, ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर, माजी नगरसेवक सुनेश जोशी, टीजेएसबीचे शरद गांगल,दिलीप सुळे, सुप्रसिद्ध उद्योजक एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक सुहास मेहता,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ठाणे संघचालक अरविंद जोशी,अजय जोशी,मकरंद अभ्यंकर, अॅड. सुयत्न धाक्रस, ब्राह्मण ज्ञाती मंडळाचे अजित गानू, हिंदु जागृती न्यासाचे अध्यक्ष मंगेश ओक, मंदिराचे विश्वस्त डॉ.सुधीर रानडे, विलास साठे, रुद्र प्रतिष्ठानचे अॅड. धनंजय सिंह सिसोदिया,मकरंद तोरस्कर, संजीव ब्रह्मे ,नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, भाजपा आध्यात्मिक आघाडी ठाणे शहर संयोजक अश्विनी पटवर्धन, विकासक महेश बोरकर,सुयश लिमये, मराठे इन्फोटेकचे विनय मराठे आदी उपस्थित होते.यावेळी न्यासाच्या वतीने जमीन मालकांचे आभार व्यक्त करण्यात आले.