मुंबई: दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांच्या ‘गदर २’ चित्रपटाच्या यशानंतर आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून नुकतीच बाबा काशी विश्वनाथ यांच्या चरणी नतमस्तक होत अनिल शर्मा यांच्या सोबत नाना पाटेकर यांनी या आगामी 'जर्नी' या चित्रपटाची घोषणा केली.
अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गदर २’ ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. भारतातच ६०० कोटींहून अधिक तर जगभरात ९०० कोटींच्या आसपास कमाई गदर २ ने केली होती. या यशनांतर अनिल शर्मा यांनी आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. अनिल शर्मा यांनी समाज माध्यमावर एक फोटो शेअर करत म्हटले आहे की, “ ‘गदर २’च्या यशानंतर बाबा काशी विश्वनाथ यांच्या चरणी लीन होत आम्ही आमच्या पुढच्या ‘जर्नी’ची सुरुवात केली.”