आसाममध्ये २०० वर्षे जुन्या मंदिराला आग! धार्मिक भावना दुखावण्याचा कट असल्याचा आरोप
10 Nov 2023 14:50:33
दिसपुर : आसामधील करीमगंज येथील २०० वर्ष जुन्या मंदिराला काही समाजकंटकांनी आग लावली आहे. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या या मंदिराला आग लावल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ही घटना रतबारी येथील ररेसरा गावात असलेल्या दामसरा या दुर्गम आदिवासी गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शतकानुशतके हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेल्या प्राचिन मंदिराला काही अज्ञात लोकांनी रात्रीच्या वेळी आग लावली आहे. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला राम बर्मन यांनी या भागात या मंदिराची स्थापना केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच इथे शिव पार्वती आणि लक्ष्मी नारायण यांच्या मुर्त्या असून त्या आगेत जळून राख झाल्या आहेत. दरम्यान, काही समाजकंटकांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी मंदिराला आग लावल्याचा आरोप येथील स्थानिक महिलांनी केला आहे. तसेच याप्रकरणी दोषींना योग्य ती शिक्षा देण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आयुक्त, पोलिस अधीक्षकांसह पोलिस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या गावात आदिवासी राहत आहेत. दरम्यान, अलीकडच्या काळात इतर समुदायातील लोक इथल्या जमिनीवर जबरदस्तीने दावा करत असल्याने तणाव वाढत आहे. यातच आता मंदिराला आग लावल्याने इथे आणखी तणाव निर्माण झाला आहे.