न्हावाशेवा–शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा

09 Oct 2023 19:43:16
 
sealink

नवी मुंबई :
एमएमआरडीए तर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित न्हावाशेवा- शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील दिवाळे, बेलापूर, सारसोळे, वाशी, ऐरोली येथील मच्छीमार बांधवांना बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकसान भरपाईची ५ कोटी ५६ लाख रक्कम थेट मच्छीमार बांधवांचा बँक खात्यात जमा झाली आहे.

याच अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकरता  न्हावाशेवा-शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवांनी सीबीडी येथील वारकरी भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन फगेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अनंता बोस यांच्यासहित सर्व मच्छीमार अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, यासंदर्भात एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पहिला हप्ता प्राप्त झालेल्या ८३ मच्छीमार बांधवांना दुसरा हप्ता म्हणून रु. १,३४,०००/- व नव्याने पात्र झालेल्या १३२ मच्छीमार बांधवांना पहिला व दुसरा हप्ता म्हणून रु. ३,३७'०००/- नुकसान भरपाई मिळाली आहे. हि रक्कम डी.बी.टी. द्वारे थेट प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. तसेच उर्वरित ज्या मच्छीमार बांधवांची कागदपत्रांच्या अभावी सदरची प्रक्रिया अपूर्ण आहे ती लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी करून नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल. कोणताही कोळी बांधव हा या नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही.

न्हावाशेवा शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता मी गेली ४ वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करीत होती. येथील कोळी बांधव मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात म्हणून माझ्या मच्छीमार कोळी बांधवांना संकटातून बाहेर काढणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे. तसेच तत्कालीन एमएमआरडीएचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने व घेतलेल्या निर्णयामुळे आज न्हावाशेवा-शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवाना दिवाळी भेट मिळाली, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0