सावधान... ऑक्टोबर हिटमुळे उष्माघाताचा धोका; तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यत

09 Oct 2023 19:18:48
October Heatstroke In Thane District

ठाणे :
सप्टेंबर महिन्यात धुवाँधार बरसात केल्यानंतर परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात दडी मारली. परिणामी, उन्हाचा पारा चढला असुन हवेत आद्रता असल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढताच राहिला असुन गेले काही दिवस तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यत पोहचले आहे. सोमवारी ठाण्यात ३५.०६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. तेव्हा, कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा (हीटस्ट्रोक) धोका वाढला आहे.

पावसाने उसंत घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. मागील सहा दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होऊन ठाणे शहराचे तापमान पस्तीशी पार पोहचल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केली आहे. एल निनो मुळे यंदा तापमानात वाढ होण्याची शक्यता असुन २०२४ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत उन्हाचा ज्वर कायम राहण्याची शक्यता आहे, या वर्षी डिसेंबरच्या आसपास तापमानाचा उच्चांक अपेक्षित आहे, अशी शक्यता हवामान विभागाकडून शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर शहरातील नैसर्गिक संपदेला हानी पोहचल्याने तसेच बहुतांश रस्ते सिमेंट-कॉंक्रीटचे बनल्याने मातीशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे मत पर्यावरण तज्ञ व्यक्त करत आहेत.

उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांच्या वेळादेखील बदलल्या आहेत. दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली असते.तीव्र उष्णतेने डांबरी रस्ते वितळत आहेत. रविवारी म्हणजेच ८ ऑक्टो. ला तापमानात वाढ होऊन कमाल ३६.०४ अंश सेल्सिअस इतके नोंद झाली.

ही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्या

उन्हाच्या झळा बसून थकवा आणि उष्माघाताचा धोका संभवतो. प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ फेरा हाईट पर्यंत किंवा ४० डिग्री सेल्सिअस पोचल्यास तीव्र डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे,लहान मुलांचा आहार घेण्यास नकार, चिडचिड, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, रक्तस्त्राव होणे, तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उष्णतेच्या त्रासासाठी संपर्क

उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.‌ त्यानुसार शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेली व्यक्ती दृष्टीस पडल्यास त्वरित १०२ अथवा १०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

हे टाळावे!

उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे.दुपारच्या वेळी स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाकावेळी दरवाजे खिडक्या उघडा ठेवाव्यात जेणेकरून स्वयंपाक घरात हवा खेळती राहील.उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावी. अनवाणी उन्हात चालू नये.लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना आत मध्ये ठेवून गाडी बंद करू नये.चहा, कॉफी, मद्य, खूप साखर असलेली आणि कार्बोनेटेड द्रव्याचे सेवन टाळावे.प्रथिनांची अधिक मात्रा असलेले पदार्थ तसेच शिळे अन्न टाळावे. सैलसर व सुती कपडे शक्यतो पांढरे कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरावी.

तापमानाचा तक्ता (अंश सेल्सिअस)

दिनांक             कमाल    किमान
०१ ऑक्टो.२०२३ - ३३.६   २५.२
०२ ऑक्टो.२०२३ - ३१.५   २५.३
०३ ऑक्टो.२०२३ - ३२.७   २५.४
०४ ऑक्टो.२०२३ - ३५.२   २५.६
०५ ऑक्टो.२०२३ - ३४.६  २५.५
०६ ऑक्टो.२०२३ - ३४.२   २५.३
०७ ऑक्टो.२०२३ - ३४.४   २५.३
०८ ऑक्टो.२०२३ - ३६.४   २५.६
०९ ऑक्टो.२०२३ - ३५.६    २६.६

Powered By Sangraha 9.0