परळी तीर्थक्षेत्रासाठी २८६ कोटींची तरतूद; मराठवाड्यासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

09 Oct 2023 20:13:03
Government of Maharashtra On Parali Teerthkshetra

मुंबई :
मराठवाड्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकासासाठी २८६.६८ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. सोमवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या २८६.६८ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या तसेच परळीचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा मूळ आराखडा हा १३३ कोटींचा होता. मात्र मंदिरात दगडी भिंती बांधून जीर्णोद्धार करणे, यात्री प्रतिक्षालय अशी एकूण ९२ कामे करावयाची असून, या कामांची किंमत अनेक पटींनी आता वाढली आहे. जिल्हाधिकारी बीड यांनी या कामाचा सुधारित आराखडा मान्यतेस्तव सादर केला होता.

अनेक शतकापूर्वी वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. त्याच धर्तीवर आता नव्याने जीर्णोद्धार व विकास व्हावा, मेरू पर्वत, प्रदक्षिणा मार्ग विकसित व्हावा, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळ मंदिरांसह परिसरातील अन्य सर्व मंदिरांचेही संवर्धन व्हावे, यादृष्टीने हा विकास आराखडा मंजूर होणे अत्यंत आवश्यक असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. अखेरसी शासनाने या भावनेला प्रतिसाद देत भरघोष निधीची तरतूद करण्यास मंजुरी दिली आहे.

Powered By Sangraha 9.0