ये मोह मोह के धागे...

09 Oct 2023 20:50:06
Article on feeling that you want to do something

सामान्य व्यक्तीला जवळजवळ दररोज प्रलोभनांचा सामना करावा लागतो. जोपर्यंत मोह केवळ एक विचार म्हणून अस्तित्वात आहे, तेव्हा तो स्वतःच सामान्य असतो आणि बहुतेक वेळा निरुपद्रवी असतो. मोह हा खिडकीतून आपल्यावर नजर ठेवणारा सैतान आहे. त्याला आत बोलावणे आणि त्याला शरण जाणे म्हणजे आयुष्याचा विध्वंस करण्यासारखे आहे.

मद्यपान, मादक पदार्थांचे सेवन, अवाजवी खाणे या गोष्टी मानसशास्त्रज्ञांनी समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला. आपण आपल्या मोहाला किंवा प्रलोभनांना सहज बळी का पडतो? आपल्यापैकी ज्यांना कठोर व्यसन नाही, त्यांनाही वेळोवेळी आपल्या लालसेवर नियंत्रण आणण्यास का त्रास होतो? मग मोह सिगारेटचा असो किंवा केक आईस्क्रिम रूपात असो. सुपरमार्केटच्या चॉकलेट विभागातून फक्त एक सहज प्रवास किंवा सहकार्‍याकडून ’मला मोहात पाडू नकोस’ किंवा ’ओह, ते किती चविष्ट आहे’ असे शब्द उच्चारण्यासाठी तुम्हाला केकची ऑफर लागते, पण प्रत्यक्षात मोह म्हणजे काय? आपल्यापैकी काहीजण इतरांपेक्षा सहजपणे त्यात प्रवेश का करतात? हे आजही आपल्याला समजलेले नाही.

प्रलोभन किंवा मोह म्हणजे काय?

प्रलोभन जबरदस्त असू शकते आणि ते अनेकदा तीव्र लालसेसह उद्भवते. व्यसनातून बरे झालेले बरेच लोक ड्रग्ज किंवा अल्कोहोल यासारख्या व्यसनात गुंतण्याच्या मोहाच्या भावनांचे वर्णन करताना दिसून येतात. परंतु, प्रलोभन अधिक सांसारिक परिस्थितीतदेखील येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीला आहार कंट्रोल करत असताना चॉकलेट खाण्याचा मोह होऊ शकतो, महत्त्वाचे काम करणे टाळावे आणि त्याऐवजी टेलिव्हिजन पाहावे असे वाटते किंवा त्यांना परवडणारे नसले तरीसुद्धा महागडे कपडे व पर्फ्युम विकत घ्यावेत, असे वाटू लागते. त्या रात्री हॉकी खेळाला जाण्यास प्राधान्य देऊन तुम्ही तुमचा कर चुकवण्यास कधी विलंब केला होता का? किंवा तुम्ही तुमच्या वैवाहिक नात्याबद्दल दृढपणे वचनबद्ध आहात, असे वाटत असतानाही तुम्ही कधी दुसर्‍या व्यक्तीसोबत फ्लर्ट केले आहे का? या सर्व आव्हानात्मक परिस्थितींमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छाशक्तीची आणि स्वनियंत्रणाची आवश्यकता असते.

सामान्य व्यक्तीला जवळजवळ दररोज प्रलोभनांचा सामना करावा लागतो. जोपर्यंत मोह केवळ एक विचार म्हणून अस्तित्वात आहे, तेव्हा तो स्वतःच सामान्य असतो आणि बहुतेक वेळा निरुपद्रवी असतो. मोह हा खिडकीतून आपल्यावर नजर ठेवणारा सैतान आहे. त्याला आत बोलावणे आणि त्याला शरण जाणे म्हणजे आयुष्याचा विध्वंस करण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही प्रलोभनावर कृती करता आणि एखाद्या अविचारी वर्तनात गुंतत जाता, तेव्हा मोह विध्वंसक होऊन जातो. तुम्ही जे खात आहात, त्याबद्दल जागरुक राहण्याचा प्रयत्न करत असताना, तुम्हाला अस्वस्थ अन्न खाण्याची इच्छा असू शकते. तुम्ही ज्या प्रकल्पावर काम करत आहात, तो किती महत्त्वाचा आहे, हे तुम्हाला माहीत आहे, तरी असा एखादा प्रकल्प तुम्ही कंटाळून थांबवता किंवा तुम्ही आरोग्य सांभाळण्यासाठी लवकर झोपायला हवे होते, अशा रात्री मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असता, अशी काही प्रलोभने अधिक टोकाची असू शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फसवणूक करणारे, ड्रग्ज किंवा अल्कोहोल घेण्याचे असे काही मोह आयुष्यभरासाठी धोक्याचे असू शकतात.

उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने प्रलोभनास बळी पडून आपल्या जोडीदाराची फसवणूक केली, तर त्याच्या परिणामांमुळे अनेक अतिरिक्त समस्या त्या व्यक्तीच्या संसारात उद्भवू शकतात. या प्रसंगातून लाज आणि अपराधीपणासारख्या नकारात्मक भावना मनात घोंगवून मन अस्वस्थ होते. घटस्फोटाच्या संभाव्यतेसह नातेसंबंधावर आणि मुलांवर होणारे परिणाम शिवाय घटस्फोटाचे आर्थिक परिणाम आणि बरेच काही आहेच. एक भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी एका प्रलोभनाला बळी पडून, तुमच्या इतर गरजा पूर्ण होणार आहेत का? माणसाला प्रत्येक गरजा पूर्ण करणे, या आयुष्यात तरी शक्य नाही. हा विचार समजावून घेतल्यास तुम्हाला तुमच्या वैयक्तिक गरजांपैकी कोणत्या गरजा अधिक महत्त्वाच्या आहेत, याचे मूल्यांकन करण्यात मदत होऊ शकते. तुम्ही प्रलोभनाला कृतीत रुपांतरित करण्यापूर्वी तुमच्या वैयक्तिक आणि सामाजिक गरजांच्या प्राधान्यक्रमांची आठवण करून देऊन, तुमच्या प्रलोभनांमुळे होणारी स्व-विनाशकारी सवय निर्माण करण्याचा धोका कमी करू शकता.

हे खरे आहे की, भुरळ पाडणारे अनेक विचार हाताळणे कठीण असू शकते आणि त्यांचे व्यवस्थापन करताना आपण सतत आपल्या स्वतःशीलढतो आहोत, असे आपल्याला वाटू शकते. पण, मुळात समस्या अशी आहे की, माणूस म्हणून तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणे कुणालाही शक्य नाही. कारण, एखाद्या प्रलोभनाला बळी पडल्याने इतर सांस्कृतिक गरजा पूर्ण होत नाहीत. शेवटी माणूस म्हणून आपल्या निर्णयांचे समर्थन करण्यात आपल्याला जन्मजात स्वारस्य आहे. आपला तो स्वभावच आहे. प्रलोभनाला शरण गेल्याने व कृती केल्याने भविष्यातील येणार्‍या प्रलोभनांचे अति-समर्थन करून किंवा पुन्हा पुन्हा इच्छा करून त्यावर मोहास बळी पडणे सोपे होऊ शकते. यामुळे स्व-विध्वंसक वर्तनाचा एक पॅटर्न आयुष्यात निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे महत्त्वाच्या गरजा पूर्ण होत नाहीत. सुरुवातीपासूनच प्रलोभनांचे व्यवस्थापन करणे, त्यांच्यावर कृती करणे टाळणे आणि आपण आपल्या इतर महत्त्वाच्या आवश्यक गरजा कशा पाहता याचा गंभीर पुनर्विचार कसा करावा, हे शिकणे म्हणूनच महत्त्वाचे आहे.

काही प्रकरणांमध्ये तुम्हाला माहीत आहे की, अमूक एक गोष्ट तुम्हाला मोहात पाडेल आणि तुम्ही त्यात वाहत जाल. अशी परिस्थिती तुम्ही टाळू शकता. जसे की, तुम्ही ज्याच्याकडे आकर्षित होत आहात, त्या व्यक्तीसोबत एकटे राहण्याचे टाळणे किंवा घरात अनावश्यक प्रमाणात अन्न किंवा अल्कोहोल न ठेवणे. परंतु, मोहाची प्रत्येक परिस्थिती नेहमीच टाळता येत नाही. ‘मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर, किती हाकला हाकला, फिरुनं येतं पिकांवर’ अशी सर्वसामान्य मनाची परिस्थिती. कधीकधी तुम्हाला प्रलोभनांचा सामना करावा लागतो. काही लोक कसे आणि का स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास समर्थ असतात, हे आपण पुढील लेखात पाहूया. (क्रमश:)

डॉ. शुभांगी पारकर
Powered By Sangraha 9.0