इस्त्रायलच्या मदतीसाठी अमेरिका मैदानात; नौदलाचा स्ट्राइक ग्रुप भूमध्य समुद्राकडे रवाना

09 Oct 2023 16:09:57

America Strike group


मुंबई :
इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरूच आहे. यात आतापर्यंत असंख्य लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता अमेरिकेने इस्त्रायलला मदत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नौदलाच्या 'फोर्ड कॅरियर स्ट्राइक ग्रुप'ला इस्रायलला मदत करण्यासाठी सज्ज राहण्यासाठी पूर्व भूमध्य समुद्रात जाण्याचे आदेश दिले आहेत.
 
यातच अमेरिकेच्या नौदलाची 'विमानवाहू नौका' आणि त्यांचा संपूर्ण ताफा पूर्व भूमध्य समुद्राकडे वेगाने पुढे जात आहे. ही विमानवाहू नौका प्राणघातक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. हा संपूर्ण ताफा अंदाजे ३००० लांब पल्ल्याच्या आणि कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. तसेच या ताफ्यात एका पाणबुडीचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अमेरिका आपली सर्वात नवीन आणि प्रगत विमानवाहू युद्धनौका यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड पाठवत आहे. यावर सुमारे ५००० नौदल सैन्य आहेत आणि ही युद्धनौका अनेक उच्च-तंत्रज्ञान क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास ती सक्षम आहे.
 
हमासने गाझा पट्टीतून शनिवारी सकाळी इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात ६०० इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इस्त्रायनेही हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे ठरवले. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीमध्ये जवळपास ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात भीषण हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.



Powered By Sangraha 9.0