रांची : झारखंडमधील हजारीबागमध्ये दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. पेलावल भागात राज्याची राजधानी रांचीमध्ये आयोजित 'शौर्य जागरण यात्रे'वरून परतणाऱ्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली. तर एका महिलेसह १० जण जखमी झाले आहेत. दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास एका मशिदीजवळ ही घटना घडली. स्थानिक पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणतात की,या प्रकरणाचा तपास केला जात आहे आणि त्या आधारे अटक केली जाईल.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दगडफेक करणार्या समाजातील लोकांचे म्हणणे आहे की, हिंदू भाविकांची बस मशिदीसमोर थांबली होती आणि तेथे धार्मिक घोषणाबाजी करण्यात आली होती. पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे मोठी घटना टळल्याचा दावा एसपींनी केला. हिंसाचार करणाऱ्या लोकांचा पोलिसांनी पाठलाग केला, त्यानंतर बस गंतव्यस्थानाकडे रवाना करण्यात आली. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शिवाय त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. जानेवारी २०२४ मध्ये राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी देशातील लाखो गावांमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याची योजना सुरू आहे. ‘विश्व हिंदू परिषदे’ची युवा शाखा ‘बजरंग दला'ने रांचीमध्ये ‘शौर्य जागरण’ नावाने ४ यात्रा काढल्या आहेत. या यात्रांमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. या घटनेनंतर 'झारखंड मानवाधिकार महासभे'ने पोलिसांना या रॅलींवर कडक नजर ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेवर भाष्य करताना झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी म्हणाले, “हजारीबागमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला निषेध करण्यासारखा आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणात बुडालेल्या हेमंत सोरेन सरकारमध्ये विशिष्ट समाजाच्या गुंडांना गुंडगिरी करायला मोकळा लगाम मिळाला आहे. रांचीमध्ये झालेल्या दंगलीत आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि आता हा हल्ला हजारीबागमध्ये झाला आहे.
झारखंड पोलिसांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान जुलै २०२३ च्या अखेरीस हरियाणाच्या मेवातमधील नूहमध्ये मिरवणुकीवर केवळ दगडफेकच झाली नाही, तर यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला आणि रुग्णालयांचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी काँग्रेस नेते ममन खान यांना अटक करण्यात आली होती, मात्र आता त्यांना जामीन मिळाला आहे.