मुंबई : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर येत्या १४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे. या सामन्याआधीच स्टेडिअम उडवून देण्याची धमकी देणारा मेल मुंबई पोलिसांना आला होता. या मेलमुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून गुजरात पोलिसांनी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.
मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने ५०० कोटी रुपये आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची तुरुंगातून सुटका करण्याची मागणीही मेलद्वारे केली होती. तरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त चिराग कोराडिया यांनी याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
शनिवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. अशात एका अज्ञात व्यक्तीने नरेंद्र मोदी स्टेडिअम उडवण्याची धमकी दिली आहे. तरी, या धमकीला घाबरण्याची गरज नाही.