चेन्नई : भारताने ‘वर्ल्ड कप’च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजयी सलामी दिली. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कांगारुंचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. त्यांनी ४९.३ षटकांत सर्व बाद १९९ धावा करून अवघ्या २०० धावांचे माफक लक्ष्य ठेवले. २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. संघाने दहा षटकांत तीन बाद २७ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर शून्य धावांवर बाद झाले. विराट कोहली आणि केएल राहुलने भारतीय डाव सावरला. भारताने ४१.२ षटकांत चार गडी गमावून विजय नोंदवला.
विराट कोहलीला १२ धावांवर असताना जीवदान मिळाले. मिचेल मार्शने त्याचा झेल सोडला त्याचा फायदा विराटने पुरेपूर घेतला. विराट कोहलीने के एल राहुलच्या सोबतीने १६५ धावांची बहुमुल्य भागीदारी केली. त्याच्या जोरावर भारताने सामन्यात आपला दबदबा कायम राखला.
दरम्यान, या सामन्यावर भारतीय गोलंदाजांची पकड पाहायला मिळाली. भारताकडून जसप्रीत बुमराह ( २ विकेट्स) आणि मोहम्मद सिराज(१ विकेट्स) यांनी चांगला स्पेल टाकला. जसप्रीस बुमराह सामन्याच्या तिसऱ्या षटकात मिचेल मार्शला शून्यावर बाद केले. तसेच, फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले. भारताकडून सर्वाधिक ३ विकेट्स फिरकीपटू रवींद्र जडेजाने घेतल्या तर कुलदीप यादव आणि रविचंद्रन आश्विन यांनी अनुक्रमे २ आणि १ बळी घेतले.
मिचेल मार्श आणि डेव्हिर वॉर्नर या सलामीवीर भागीदारी करण्यात अपयशी ठरले. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मिचेल मार्श शुन्यावर बाद झाला. भारताच्या फिरकीसमोर कांगारुंची अक्षरशः वाताहत झाल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक स्टीव्ह स्मिथ ४६ धावांवर खेळत असताना जडेजाच्या फिरकीवर त्रिफळाचित झाला.