'नभः स्पृशं दीप्तम्'! ९१ वर्धापनदिनी हवाई दलाला मिळाला नवा ध्वज

08 Oct 2023 11:32:34
air force 
 
मुंबई : हवाई दलाच्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय हवाई दलाला नवा ध्वज मिळाला आहे. ७२ वर्षांनंतर भारतीय हवाई दलाच्या ध्वजामध्ये बदल करण्यात आला आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल व्हीआर चौधरी यांनी परेड दरम्यान नवा ध्वज फडकवला आणि हवाई दलातील सैनिकांना शपथही दिली.
 
देशाच्या सशस्त्र दलांमध्ये भारतीय वायुसेनेचा अधिकृत समावेश ८ ऑक्टोबर १९३२ रोजी करण्यात आला होता. तेव्हापासून ८ ऑक्टोंबर वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस भारतीय हवाई दल प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.
 
हवाई दलाचा जुना ध्वज हटवल्यानंतर सेंट्रल एअर कमांड म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. याआधी भारतीय नौदलाच्या ध्वजातही बदल करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये हवाई दलाचा ध्वज तयार करण्यात आला होता. सध्याचा ध्वज निळा आहे. यात वरच्या डाव्या कोपऱ्यात तिरंगा आहे, तर तळाशी उजव्या कोपऱ्यात हवाई दलाचे गोल चिन्ह आहे.
 
नवीन ध्वजात ब्रिटीशांच्या काळात असलेला गोल आकार काढून टाकण्यात आला आहे. नवीन ध्वज भारतीय वायुसेनेची मूल्ये अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करेल. नवीन ध्वजाच्या शीर्षस्थानी अशोकाचे सिंह हे राष्ट्रीय चिन्ह आणि त्याखाली देवनागरीमध्ये सत्यमेव जयते असे शब्द आहेत. सिंहाच्या खाली एक हिमालयीन गरुड आहे ज्याचे पंख पसरलेले आहेत, जे भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वृत्तीचे प्रतीक आहे. हिमालयीन गरुडाभोवती भारतीय वायुसेनेचा शिलालेख आहे. भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्य 'नभः स्पृशं दीप्तम्' हे हिमालयन गरुडाच्या खाली सोनेरी देवनागरी अक्षरात कोरलेले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0