ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिर कात टाकणार

07 Oct 2023 19:15:51
TMC Municipal Commissioner At Shri Kaupineswar Temple

ठाणे :
ठाण्यातील प्राचीन कौपीनेश्वर मंदिर कात टाकणार आहे. कौपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नुकतीच मंदिराची पाहणी केली. मंदिराचा जीर्णोद्धाराची प्रक्रिया मंदिरांचे स्ट्रक्चरल ऑडिट, तसेच माती परीक्षण महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल, असे या बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.बैठकीस, ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी तसेच, विश्वस्त अनिकेत भावे, सचिव रवींद्र उतेकर, खजिनदार मकरंद रेगे आदी उपस्थित होते.

श्री कौपिनेश्वर मंदीर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे चार फूट तीन इंच उंचीचे व १२ फुटी घेर असलेले शिवलिंग आणि ठाणेकरांची ग्रामदेवता असलेले कौपिनेश्वर मंदिर शिलाहार राजांच्या राजवटीच्या काळामध्ये इ. स. ८१० ते १२४० दरम्यान बांधले गेले. १८७९ मध्ये वर्गणी गोळा करून मंदिराचा पुन्हा जीर्णोध्दार करण्यात आला. त्यानंतर १९९६ मध्ये या सभामंडपाचाही जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत. या मंदिर परिसरात भाजी मंडई आणि ठाण्याची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे हा परिसर दाटीवाटीचा आणि गर्दीचा आहे.

या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचा संकल्प केला असून याबाबतची पाहणी मंदिराच्या विश्वस्तांसोबत करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्त बांगर आणि जिल्हाधिकारी शिनगारे यांना दिल्या होत्या. त्यानुसार मंदिराच्या विश्वस्तासमवेत नुकतीच बैठक पार पडली.मुख्य मंदिराचे डिझाईन, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व व मंदिराच्या नवीन गाभा-याचा परिसर, मंदिराचा कळस, सभामंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणे तसेच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्वांना विश्वासात घेवून कार्यवाही केली जाईल असे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी नमूद केले.

स्ट्रक्चरल ऑडिटनंतरच निर्णय

कौपिनेश्वर मंदिराचे स्ट्रक्चरल आँडिट झाल्यानंतर ही वास्तू दुरुस्त करायची की पूर्ण मंदिराचा नव्याने जिर्णोद्धार करावा हे स्पष्ट होईल. तसेच माती परिक्षण केल्यानंतर खडक किती अंतरावर आहे, पाणी किती खोलीवर आहे हे कळेल, त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्यानंतरच स्पष्ट होतील. सुशोभिकरणाबाबत पुण्यातील वास्तुरचनाकार अरूण कलमदानी यांनी एक आराखडा तयार केला आहे. तसेच जर मंदिराचा पूर्ण जिर्णोद्धार करायचा झाल्यास ऐतिहासिक वास्तू व त्याकाळात करण्यात आलेले दगडी बांधकाम याचा विचार करुनच बांधकाम करावे लागणार आहे, त्यास विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी सहमती दर्शवली.
 
आ. संजय केळकर यांचाही पाठपुरावा

ठाणे शहरालाही शेकडो वर्षांचा इतिहासआहे.हा इतिहास जतन करण्यासाठी आ. संजय केळकर सातत्याने प्रयत्नशील असतात.या पार्श्वभूमीवर ठाण्यातील पुरातन कौपीनेश्वर मंदिराचे नुतनीकरण करण्यासाठी नियोजन समितीच्या माध्यमातुन तसेच शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आ. केळकर यांनी नोव्हे.२०२२ मध्ये केली होती.

Powered By Sangraha 9.0