वसईत 'एकविसावा साहित्य जल्लोष' संपन्न!

07 Oct 2023 22:45:16
Sahitya Jallosh in Vasai

वसई( प्रतिनिधी)
 : भाषेच्या व्यवहाराचा जल्लोष करण्याचा सामर्थ साहित्यात आहे. त्याचा जल्लोष व्हायला हवा असे मत असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. वसईत आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष"या कार्यक्रमात ते बोलत होते. वसईत दि. ७ ऑक्टोबर रोजी आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" हा कार्यक्रम संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात साजरा झाला.

साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" साहित्यिक गंगाधर गाडगीळ, वसंत सबनीस, सदानंद रेगे, के.जे. पुरोहित(शांताराम), दि. कुलकर्णी आणि शांताबाई कांबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वसई - विरार शहर महानगरपालिका आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय यांच्या सहकार्याने आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवला गेला.

यंदा साहित्य जल्लोष या कार्यक्रमाचे २६ वे वर्ष होते. या कार्यक्रमाला 'चित्रलेखा' या साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव आणि दै. सकाळचे संपादक राहुल गलपाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर, साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अशोक मुळे , लेखिका सिसिलिया कार्व्हालो, वसईचे प्रथम महापौर राजीव पाटील, वसई विरार चे माजी महापौर प्रवीण शेट्टी, साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅन्ड्रयू कोलासो, सचिव संदेश जाधव, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ विभुते यांची विशेष उपस्थिती होती.

साहित्य म्हणजे सहितत्व असण्याचा गुणधर्म. शब्द आणि अर्थ यांच एकत्रीकरण म्हणजे साहित्य. शब्द आणि अर्थ यांचा संबंध कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यत पोहोचतो. जसे भाषेचे अनेक व्यवहार होत असतात, तसाच एक व्यवहार म्हणजे साहित्याचा व्यवहार. साहित्याचा व्यवहार महाराष्ट्रातील संतांनीच केला आहे. साहित्य व्यवहाराचा जल्लोष झालाच पाहिजे ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.


या वेळी चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी साहित्य आणि समाज या विषयावर आपले मत मांडले. साहित्य समाजाचे हित पाहते आणि समाजाच्या हितासहित लोकांपर्यंत पोहोचते ते खरे साहित्य. त्यामुळे लोकांच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरणारं साहित्य कोणतं हे साहित्य संमेलनातून पोहोचवणे आवश्यक आहे, असे ही ज्ञानेश महाराव यांनी सांगितले.

दरम्यान या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात राहुल गलपाडे म्हणाले की , साहित्य जल्लोष हा असा उपक्रम आहे जो आपल्याला जिवंत आहोत याची जाणीव करून देतो. आपल्या विचारांना मिळणारी चालना, बुद्धीला मिळणारी खाद्य या उपक्रमांमुळे मिळत असते. विचार करण्याची ताकद या कार्यक्रमामुळे मिळतेय. यासाठी या कार्यक्रमाची गरज तरुण पिढीला जास्त आहे.या साहित्य जल्लोष कार्यक्रमात कविसमेलन, परिसंवाद, गीतांचा कार्यक्रम ही साजरा करण्यात आला.तसेच या कार्यक्रमाच्या पुर्वसंध्येला या उपक्रमाचा भाग म्हणून दि. ६ ऑक्टोबर रोजी वकृत्व स्पर्धा आणि विद्यार्थी कविसंमेलन आयोजित केले होते. उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ पार पडला.


Powered By Sangraha 9.0