श्री. र. वर्तक लिखित ‘स्वा. सावरकरांची प्रभावळ‘

07 Oct 2023 22:48:58
Article on Krishnaji Balwant Mahabal

कृष्णाजी बळवंत महाबळ यांचा जन्म दि. १५ ऑगस्ट १८८६चा. म्हणजे तात्याराव सावरकर यांचे ते समकालीन. महाबळ यांचा जन्म बडोद्याला झालेला असला तरी शिक्षण नाशिकला चालू होते. सावरकरांच्या सहवासात आलेले आणि त्यामुळे देशप्रेमाने झपाटून गेलेले जे तरूण होते, त्यात महाबळ यांचा समावेश होता. या तरुणांनी ‘मित्रसमाज’ नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेत अन्य विद्यार्थ्यांना आणून त्यांच्या मनात सशस्त्र क्रांतीची ज्योत पेटवायची, असा या तरुणांचा प्रयत्न असे.

या चळवळीत भाग घेणार्‍या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या बळकट असावे, यासाठी महाबळ आटोकाट प्रयत्न करीत असत. लाठी/दांडपट्टा/तलवार चालविणे, कुस्ती खेळणे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण ते तरुणांना देत असत. त्यामुळे आणि पुढच्या काळात शिक्षक म्हणून काम केल्याने ते ’महाबळ गुरुजी’ या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी नाशिकमध्ये ‘यशवंत व्यायामशाळा‘ स्थापन केली. आता या संस्थेला १०० वर्षे होऊन गेली आहेत, तरीही तिचे काम जोमाने सुरू आहे.

दि. २१ डिसेंबर १९०९ यादिवशी नाशिकमध्ये एक अत्यंत खळबळजनक घटना घडली. ती म्हणजे जिल्हाधिकारी जॅक्सन याचा अनंत कान्हेरे या तरुणाने केलेला वध. ही घटना विजयानंद नावाच्या नाट्यगृहात घडली. त्यावेळेस तेथे ‘संगीतशारदा‘या नाटकाचा प्रयोग चालू होता. या नाट्यगृहाला खेटून नगरपालिकेची एक शाळा होती. महाबळ गुरुजी या शाळेत बसून एका भगदाडातून, हे नाटक पाहत होते. वधानंतर नाशिकमध्ये मोठी धरपकड झाली. पोलिसांचा महाबळ गुरुजींवर संशय होताच. त्यांचीदेखील कसून चौकशी झाली. पण, पोलिसांच्या हाती काहीच धागादोरा लागला नाही. पण, त्यांना तसेच कसे सोडून द्यायचे म्हणून सरकारने काय करावे? त्यांनी शाळेत बसून नाटक पाहिले म्हणजे नगरपालिकेच्या जागेचा वापर अनधिकृतपणे केला, अशा हास्यास्पद आरोपाखाली त्यांना शाळेतून चक्क काढून टाकण्यात आले! उदरनिर्वाहाचे साधन अशारितीने अचानक नाहीसे झाल्यामुळे पुढच्या काळात त्यांना फार मोठ्या हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, हे वेगळे सांगायला नकोच.

कवी गोविंद यांच्या काही देशभक्तीपर कविता प्रसिद्ध केल्या म्हणून बाबाराव सावरकर यांना गजाआड करण्यात आले. खटला सुरू झाला. त्यांच्याविरुद्ध अधिक पुरावा मिळू नये तसेच इतर क्रांतिकारकांना त्रास होऊ नये म्हणून भगूरच्या घरातील काही कागदपत्रे जाळून टाकणे आवश्यक होते. महाबळ गुरुजी रातोरात भगूरला गेले आणि हे अतिशय महत्त्वाचे काम त्यांनी बिनबोभाट पार पाडले. याची माहिती श्री. र. वर्तक यांनी दिली आहे. स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद यांच्या अनेक प्रेरणादायी कविता त्यावेळच्या तरुणांच्या ओठावर होत्या. स्वतः कवी गोविंद शरीराने अपंग असले, तरी त्यांची कविता नवी भरारी घेत होती. त्यांच्या शेवटच्या आजारात महाबळ गुरुजींनी त्यांची हरप्रकारे सेवा केली. गोविंद यांना लेखन करणे शक्य नव्हते. म्हणून ते त्यांच्या कविता महाबळ गुरुजींना लिहून घ्यायला सांगत. त्यापैकी ‘सुंदर मी होणार‘ ही कविता मराठी साहित्यात अजरामर झाली आहे.

ती त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या अवघ्या १५ दिवस आधी रचलेली आहे. मृत्यूमुळे मी पुढच्या जन्मात धडधाकट (सुंदर!) स्वरुपात या जगात येणार, असा आशय असलेली ही कविता अतिशय हृदयस्पर्शी आहे. १९२६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. महाबळ गुरुजी यांनी कवी गोविंदांचे अंत्यसंस्कार तर केलेच; पण त्यानंतर दरवर्षी पितृपंधरवड्यात त्यांना पिंडदानही केले. जणू काही कवी गोविंद त्यांचे जवळचे नातेवाईकच होते! पुढे १९५६ साली वेगळाच किस्सा घडला. गोविंद यांनी रचलेली ‘सरस्वतीची भूपाळी‘ गुरुजींना आकाशवाणीवर सादर करायची होती. या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर‘ असा उल्लेख होता.

राजापेक्षा राजनिष्ठ असलेल्या आकाशवाणीच्या एका अधिकार्‍याने आक्षेप घेतला आणि फक्त ‘वीर सावरकर‘ असे म्हणता येईल अशी अट घातली! सावरकरांच्या बद्दल सरकारी अधिकार्‍यांच्या मनात किती द्वेष/भीती होती, याचा हा ठळक पुरावा होता. महाबळ गुरुजींनी ही अट अगदी नाईलाजाने स्वीकारली. कारण, आपल्या अतिशय प्रतिभावान असलेल्या दिवंगत मित्राची देशभक्तीपर कविता त्यांना सगळ्या महाराष्ट्रात पोहोचवायची होती आणि त्यासाठी त्यावेळी दुसरे साधन नव्हते. महाबळ गुरुजींचे नाशिक येथे राहणारे नातू रघुनाथ प्रभाकर महाबळ यांनी त्यांचे साधार चरित्र अतिशय कष्टपूर्वक लिहून प्रसिद्ध केले आहे, त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

डॉ. गिरीश पिंपळे
९४२३९६५६८६
Powered By Sangraha 9.0