जातजनगणनेस स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालयात पुढील वर्षी सुनावणी

06 Oct 2023 16:30:55

suprim court

नवी दिल्ली :
बिहार सरकारच्या जात जनगणनेविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारची स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणावर सविस्तर सुनावणीची गरज असून पुढील सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणार आहे.

बिहार सरकारने २ ऑक्टोबर रोजी जात सर्वेक्षण जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३ ऑक्टोबर रोजी याचिकाकर्त्याने जातीची आकडेवारी जाहीर करण्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य करून आणि सुनावणीसाठी ६ ऑक्टोबरची तारीख दिली होती. याप्रकरणी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. एसव्हीएम भट्टी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी याचिकाकर्त्याने न्यायालयीन सुनावणीपूर्वीच बिहार सरकारने जात जनगणनेची आकडेवारी जाहिर केल्याचे सांगितले. त्यावर आकडेवारी जाहिर करण्यास न्यायालयाने मनाई केली नसल्याचे खंडपीठाने सांगितले. त्याचप्रमाणे न्यायालयाने जैसे थे आदेश देण्यासही नकार दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी जानेवारी २०२४ मध्ये होणार आहे.

Powered By Sangraha 9.0