नवी दिल्ली : करोनाकाळात माणसे मरत असताना मास्क लावून नोटा मोजणाऱ्यांनी आमच्या सरकारवर टिका करू नये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि उबाठाप्रमुख उध्दव ठाकरे यांना शुक्रवारी लगावला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलाविलेल्या नक्षलविरोधी बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली येथे आले होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या टिकेस प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, करोना काळात पीपीई किट, मास्क आणि मृतदेह ठेवण्याच्या पिशव्यांमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला; त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही. ऑक्सिजन प्लांटपासून खिचडीपर्यंत सर्वत्र पैसे खाण्यात आले आहेत.
करोना काळात आपण पीपीई किट घालून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यात व्यस्त होते. त्यावेळी ठाकरे हे मास्क घालून घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते. त्याचप्रमाणे करोनामुळे राज्यात माणसे मरत असतानाही ठाकरे हे घरात पैसे मोजण्यात व्यस्त होते. त्यामुळे ‘एक फूल आणि एक हाफ’ने आम्हाला शिकवू नये असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
करोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आमदार अपात्रता सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे, त्यामध्ये राज्य सरकारचा कोणताही संबंध नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयासही सल्ले देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नांदेड प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. औषधखरेदीसह सरकारी रूग्णालयातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठीदेखील आवश्यक ते निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.