ठाण्यात कंपनी बळकाविण्याचा डाव फसला

06 Oct 2023 17:33:53

thane

ठाणे :
आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर एकाकी पडलेल्या ठाण्यातील एका मराठी तरुणाची कंपनी बनावट दस्ताऐवज व स्वाक्षऱ्या करून हडपण्याचा दोघा व्यापाऱ्यांचा डाव फसला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर नौपाडा पोलिसांनी तब्बल २३ दिवसांनी व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील बी कॅबिन परिसरात राहणारे कौस्तूभ अभय वाघमारे यांच्या वडिलांची कै. अभय वाघमारेंची वोम्को लॅबोरेटीज ही सर्जीकल डिस्पोजेबल्स बनविणारी कंपनी होती. त्यांनी नवी मुंबईत कंपनीसाठी प्लॉट खरेदी केला होता. या प्लॉटवरील जुना थकीत कर भरण्यासाठी अभय वाघमारे यांनी रमेश ठाकूर यांच्याकडून २०१७ मध्ये २० लाख रुपये मदत घेतली होती. त्या पैशांच्या बदल्यात अभय वाघमारे यांनी प्लॉटमधील काही जागा रमेश ठाकूर यांना वापरण्यास दिली होती. २०१९ मध्ये अभय वाघमारे यांचे निधन झाले. तर त्यांची पत्नी लता वाघमारे यांचे २०२१ मध्ये निधन झाले.

दरम्यानच्या काळात रमेश ठाकूर व त्यांचे व्याही महेशभाई जोशी यांनी संगनमताने वोम्को लॅबोरेटरीज या कंपनीचे सिक्युरीटी ट्रान्सफर फॉर्म, वार्षिक मिटींगची नोटीस, कंपनीची बॅलन्स शिट, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, शेअर होल्डरच्या डिटेल्सचा कागद, शेअर ट्रान्सफर आदींवर दिवंगत अभय वाघमारे व दिवंगत लता वाघमारे यांच्या बनावट सह्या केल्या. तसेच त्याची रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या वेबसाईटवर नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण कंपनी व नवी मुंबईतील प्लॉटचा ताबा मिळविला होता.

कौस्तूभ वाघमारे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी अनेक वेळा रमेश ठाकूर व महेशभाई जोशी यांना संपूर्ण पैसे व्याजासह परत देण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यांच्याकडून दखल घेण्यात आली नाही. या प्रकरणी कौस्तुभ वाघमारे यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धाव घेतली. त्याकडे पोलिसांनीही दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी अॅड. वैभव साटम यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेऊन न्यायाधीश डॉ. भासरकर यांनी १२ सप्टेंबर रोजी पोलिसांना दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशी माहिती अॅड . साटम यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0