रायगड : शासनाने आंबा व काजू पिकांसाठी पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार २०२३-२४ सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. रायगड जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबई ही कंपनी नेमलेली आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमासंरक्षण मिळते. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकांसाठी (आंबा व काजू) योजना ऐच्छिक आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून ई पिक पाहणी करून फळ बागेची नोंद असलेला ७/१२ उतारा, आधारकार्ड, फळ पिकाची बाग उत्पादनक्षम असल्याबाबत स्वयंघोषणापत्र फळ बागेचा Geo Tagging केलेला फोटो व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत, वि.का.स. सेवा सोसायटीत अथवा सीएससी केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी.
या योजनेंतर्गत पुढील जोखमीच्या बाबींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधीपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल. काजू पिकासाठी अवेळी पाऊस १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी, कमी तापमान ०१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी, विमा संरक्षित रक्कम रु.०१ लाख, गारपीट दि.०१ जानेवारी ते ३० एप्रिल, विमा संरक्षित रक्कम ३३ हजार ३३३, विमा हप्ता भरण्याची अंतिम तारखी दि.३० नोव्हेंबर २०२३.
आंबा पिकासाठी अवेळी पाऊस दि.१ डिसेंबर ते दि.१५ मे, कमी तापमान दि.१ जानेवारी ते दि.१० मार्च, जास्त तापमान दि.१ मार्च ते दि.१५ मे, वेगाचा वारा दि.१६ एप्रिल ते दि.१५ मे विमा संरक्षित रक्कम रु.०१ लाख ४० हजार, गारपीट दि.१ फेब्रुवारी ते दि.३१ मे विमा संरक्षित रक्कम रु.४६ हजार ६६७] विमा हप्ता भरण्याची अंतिम तारखी दि.३० नोव्हेंबर २०२३.
आंबा फळपिकाकरिता प्रति हे.रक्कम रुपये २९ हजार ४००, व काजू फळपिकाकरिता प्रति हे.रक्कम रु.५ हजार, इतका विमा हप्ता आहे. गारपीट या हवामान धोक्यापासून विमा संरक्षणासाठी अतिरिक्त विमा हप्ता आंबा फळपिका करिता रक्कम रु.२ हजार ३३३ व काजू फळपिका करिता रक्कम रुपये १ हजार ६६७ प्रति.हे.आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी योजनेत सहभागी व्हावे.
विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक, सी.एस.सी. सेंटर किंवा पिक विमा पोर्टल https://pmfby.gov.in येथे सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. आंबा व काजू पिकाकरिता विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि. ३० नोव्हेंबर २०२३ निश्चित केलेली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी कळविले आहे.