इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार!

06 Oct 2023 19:11:51

Narges Mohammadi


मुंबई :
इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नर्गिस मोहम्मदी महिलांचे हक्क, लोकशाही यासह अनेक मुद्द्यांवर नेहमीच सक्रियपणे प्रचार करत असतात. त्यामुळे त्यांना अनेकदा अटकही झाली आहे. वर्षानुवर्षे तुरुंगात असतानाही त्यांनी त्यांचे काम थांबले नाही.
 
गेल्या अनेक वर्षांपासून नर्गिस मोहम्मदी या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी जोरदार लढा देत आहेत. या काळात त्यांनाही अनेकवेळा दडपशाही आणि अत्याचाराला सामोरे जावे लागले. नर्गिस मोहम्मदी यांना २०२१ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते.
 
त्या अजूनही तुरुंगातच आहेत. ५१ वर्षीय नर्गिस मोहम्मदी यांनी ३१ वर्षे तुरुंगात घालवली आहेत. तुरुंगात असूनही नर्गिस मोहम्मदींनी अनेकदा आपल्या लिखाणातून इराण सरकारला आव्हान दिले आहे. दरम्यान, नर्गिस मोहम्मदी यांच्या मेहनतीला यश आले आहे. त्यांना आता शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष बेरिट रिस-अँडरसन यांनी शुक्रवारी ओस्लो येथे पुरस्काराची घोषणा केली. नोबेल पुरस्कारामध्ये ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच १ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे रोख पारितोषिक असते. नोबेल पारितोषिक विजेत्यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या समारंभात सुवर्णपदके आणि पदविका प्रदान करण्यात येणार आहेत.

Powered By Sangraha 9.0