गोरेगाव आग दुर्घटनाग्रस्तांची पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून विचारपूस

06 Oct 2023 14:47:12
inquired about Goregaon fire

मुंबई : गोरेगाव (पश्चिम) उन्नत नगर येथील जय भवानी इमारतीला भीषण आग लागून या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये जाऊन आगीतील जखमींची विचारपूस केली व त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली.

पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमी नागरिकांना उपचारासाठी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे रूग्णालय, लाईफलाईन मेडीकल आणि कूपर रूग्णालयमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या घटनेवर लक्ष असून, दुर्घटनाग्रस्तांवर वेळेत उपचार व मदतीसाठी शासन तत्पर असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. यावेळी आमदार विद्या ठाकूर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

mangalprabhat lodha
Powered By Sangraha 9.0