‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि.व चि.सौ.का’ असे दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणारे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक व लेखक परेश मोकाशी यांचा ‘आत्मपॅम्फलेट’ हा चित्रपट शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला. आशिष बेंडे दिग्दर्शित आणि परेश मोकाशी लिखित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाची ख्याती रीलिजआधीच सर्वदूर पसरली आहे. ‘बर्लिन’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात ‘आत्मपॅम्फ्लेट’चा वर्ल्ड प्रीमिअर पार पडला होता, तर आशिया पॅसिफिक स्क्रिन अवॉर्ड्स, ऑस्ट्रेलियामध्ये ७० देशांतील चित्रपटांमधून ‘सर्वोत्कृष्ट युथ फिल्म’चा पुरस्कार मिळवणार्या या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
‘प्रेमकथा’ या मराठी चित्रपटांसाठी नवीन नाहीत. काळानुरुप कथानकाचा विषय तोच राहिला असला, तरी प्रेमपटाची व्याख्या मात्र बदलत गेली. याबद्दल काय सांगाल?
खरं तर प्रत्येक प्रेमकथा ही वेगळी असते आणि ती आपापल्या जागी अत्यंत निराळीही असते. कारण, अशा कथांमधील काही तपशील बदलत असतात. प्रेम ही जागतिक भावना आहे, हे आपल्याला माहीत आहेच. त्यामुळे एखादा हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश किंवा मराठी प्रेमपट असला तरी काही बाबी या नक्कीच सारख्या असू शकतात. परंतु, ठरावीक भाषेची, देशाची एक गंमत असते. घटना, पात्र वेगळी असून ती वेगवेगळ्या पद्धतीने वागत असतात. याच गोष्टीमुळे, चित्रपट, कथा, कादंबर्या आपलं वेगळपण जपत असतात. केवळ चित्रपटापुरतेच मर्यादित न राहता, प्रेमकथा असणार्या दोन प्रेमकादंबर्यांमधील घटकदेखील समान असूच शकतो. पण, तरीदेखील एकूण धाटणी, एकूण शैली किंवा ज्या माध्यमात ही कथा उलगडते, त्या माध्यमाचंदेखील एक विशेष वैशिष्ट्य असतं. तेव्हा ‘गारंबीचा बापू’ वाचताना तुम्हाला जी प्रेमकथा जाणवेल तिच प्रेमकथा तुम्हाला ‘कोसला’ वाचताना देखील अनुभव येईल. पण, दोन्ही कथांमध्ये त्यांचं निराळंपण नक्कीच तुम्हाला जाणवून येईल. तसेच, वेगळेपण ‘आत्मपॅम्फलेट’ या आमच्या चित्रपटातील प्रेमकथेच्या बाबतील प्रेक्षकांना पाहता येईल. वरकरणी जरी ती शालेय जीवनातील प्रेमकथा वाटत असली तरी देखील ती तशी राहत नाही.
‘आत्मपॅम्फलेट’ या चित्रपटाच्या अशा आगळ्यावेगळ्या नावामागचे गूढ काय?
आजपर्यंत थोरामोठ्यांच्या जीवनावर आधारित अनेक आत्मचरित्रपर चित्रपट आपण पाहिले. पण, प्रत्येक वेळी ‘बायोपिक’ करण्यासाठी मोठं किंवा अद्वितीय चरित्र असण्याचीच गरज आहे का? आपल्यासारख्या सामान्य माणसाचा ‘बायोपिक’ नसू शकतो का? तर असूच शकतो. जर तुम्ही त्या गोष्टीचे चांगल्या चित्रपटात रुपांतर करू शकलात, तर तेदेखील खिळवून ठेवणारं आत्मचरित्र होऊ शकतं. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे यांच्या जीवनात असले भन्नाट प्रसंग घडले आणि त्यांची खिळवून ठेवणारी मालिका म्हणजे ‘आत्मपॅम्फलेट’ हा चित्रपट. केवळ घटनांच्या मागे घटना न लावता एक चित्रपट म्हणून त्याला आवरण देणे किंवा वेगळी निवेदनाची शैली वापरत प्रेक्षकांना आवडेल, असे आत्मचरित्र नक्कीच पाहायला मिळेल. ज्यावेळी चित्रपटाचे नाव काय असेल, अशी चर्चा सुरू होती, तेव्हा ‘आत्मचरित्र’ हा फार जड शब्द आहे, जो आपल्यासारख्या किरकोळ व्यक्तीला पटकन समजेल का, असा प्रश्न पडला होता. शिवाय आत्मचरित्र जाडजूड असतं, आपलं तर दोन पानांमध्ये संपेल कदाचित आणि म्हणून ‘पॅम्फलेट’ ह शब्द आला. एका ‘पॅम्फलेट’ इतका ऐवज आमच्याकडे असून तो ‘आत्मपॅम्फलेट’ या चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत.
शाळकरी जीवनातील प्रेमकथा या चित्रपटातून मांडली असून, ट्रेलरच्या शेवटी जात आणि धर्म याबद्दल भाष्य करण्यात आले आहे. त्याबद्दल काय सांगाल?
या चित्रपटाचे हे वेगळेपण का आहे, तर ही शालेय जीवनातील प्रेमकथा आहे. पण, ती फक्त प्रेमकथा आहे का, तर नाही! केवळ जात आणि धर्माबद्दल ही कथा नाही. चित्रपटाच्या शेवटी तर या प्रेमवीरांचे प्रेम इतक्या अद्भुत पातळीवर जाते की ते राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय आणि शेवटी आंतरआकाशगंगीय पातळीला जातं.
आजच्या पिढीला फार कमी वयातच अनेक गोष्टी उमगतात. परंतु, त्याबद्दल माहिती मिळवण्याचे त्यांचे माध्यम चुकते का? तुम्हाला काय वाटते?
मुळात या सगळ्यात मुलांचा पालकांशी संवाद असणे फार महत्त्वाचे आहे. किंबहुना, जुन्या-जाणत्या लोकांशी त्यांनी बोलून आपल्या शंका विचारून त्यांचे निरसन करणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वी आपल्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती. त्यात केवळ शिक्षण हे अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता, जीवनाविषयक ज्ञानदेखील शिष्यांना दिले जात होते. वेदपठण, शास्त्रांची चर्चा यापलीकडे तिथे शिक्षण असायचे, तर तशी गुरुकुल पद्धती अस्तिवात नसल्यामुळे केवळ अभ्यासक्रमाला चिटकून मुलांना शिक्षण दिले जात असल्यामुळे आणि प्रश्नपत्रिकांसाठीच अभ्यास सुरू असल्यामुळे, मुलांना प्रश्न पडतात आणि त्याचाच गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
अनेक मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळताना दिसतो. पण, आपल्या महाराष्ट्रातच विविध विषयांवर आधारित चित्रपटांना तितकासा प्रतिसाद बरेचदा मिळताना दिसत नाही. याबद्दल तुमचे मत काय?
आपल्याकडे प्रेक्षक तयार आहेत. ज्या प्रकारचे चित्रपट आपण करत आहोत ते उल्लेखनीय आहेत. मात्र, महाराष्ट्र हा पहिल्यापासूनच पुरोगामी, पुढचा विचार करणारा आणि सर्वांना सामावून घेणारा प्रांत असल्यामुळे आपल्याकडे हिंदी चित्रपटांनाही तेवढं मोठं स्थान आहे. मराठी प्रेक्षक फार पूर्वीपासून हिंदी, इंग्रजी अथवा अन्य भाषांच्या चित्रपटांचाही चाहता राहिला आहे. त्यामुळे थोडं फार विभाजन झाल्यामुळे मराठी प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे, अशी शंका येते. पण, अलीकडच्या काळात जे मराठी चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या गाजले, ते पाहता ही शंका दूर होते.
दिग्दर्शक आणि लेखक म्हणून तुमचं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही कसे पोहोचवता?
मी आत्तापर्यंत दिग्दर्शित केलेल्या नाटक आणि चित्रपटांचा उद्देश हा काहीतरी संदेश देणं किंवा चांगल्या गोष्टी प्रसारित करणं असा कधीच नव्हता. कुठल्याही चित्रपट किंवा कलाकृतीचे असे ध्येय, असता कामा नये. त्याव्यतिरिक्त माध्यमातील सशक्त कलाकृती म्हणून आपण ते करू शकतो का, हे पहिलं ध्येय असले पाहिजे. कोणत्याही समस्येला चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावशाली पद्धतीने कसे मांडू शकतो, याकडे माझा अधिक कल असतो.
रसिका शिंदे-पॉल