अलाहाबाद : सप्तपदी हा हिंदू विवाहातील एक महत्त्वाचा विधी आहे. यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हिंदू धर्मातील विवाहांमध्ये सप्तपदी ही महत्त्वपूर्ण विधी असून सप्तपदीशिवाय झालेला विवाह हिंदूंमध्ये वैध नसल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
३ ऑक्टोबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. याबबतचा निर्णय देताना उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, विवाहाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असल्या परंतू, सप्तपदी न केल्यास तो विवाह संपन्न मानला जाणार नाही. उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम ७ चा संदर्भ दिला. सर्व प्रथा आणि विधींसह विवाहसोहळा पार पाडला गेला तरच तो हिंदू विवाह वैध मानला जाईल, असे या कायद्यात म्हटले आहे.
स्मृती सिंह या महिलेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. स्मृती सिंह यांनी आपल्या पतीने मिर्झापूरमध्ये आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले. यात त्यांच्यावर दुसरे लग्न केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक न्यायालयाने याप्रकरणी त्यांना समन्स जारी केलेत.
त्यामुळे त्यांनी हे आरोप खोटे असून या प्रकरणावरील कारवाई थांबवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी निर्णय देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, स्मृती सिंह यांच्या पतीकडे सप्तपदीचे पुरावे नसल्याने त्यांचे आरोप चुकीचे आहेत. तसेच यावेळी न्यायालयाने स्मृती सिंह यांच्यावरील कारवाई थांबवण्याचेही आदेश दिले आहेत.