लखनऊ : अलिगडमध्ये 'द केरला स्टोरी' या हिंदी चित्रपटासारखीच एक घटना घडली आहे. येथील एका हिंदू महिलेला तिच्या मुस्लीम मैत्रिणीने घरातून बाहेर नेले आणि नंतर तिच्यासह बेपत्ता झाली. विशेष म्हणजे ही महिला एकटी नसून तिच्यासोबत तिची सहा महिन्यांची मुलगीदेखील होती.
ही घटना गांधी पार्क पोलिस स्टेशन परिसरातील आहे. हिंदू महिलेचे पती दीपक शर्मा यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली. त्यांची पत्नी भावना शर्मा आणि ६ महिन्यांची मुलगी रिशू २९ सप्टेंबर पासून बेपत्ता आहेत. अद्याप त्या दोघी सापडल्या नसल्याचे या तक्रारीत म्हटले होते.
२ महिन्यांपूर्वी या हिंदू महिलेची इंस्टाग्रामवर माही खान नावाच्या तरुणीशी मैत्री झाली आणि त्या दोघीचं बोलणं सुरु झालं. त्यानंतर माही खान २८ सप्टेंबरला अलीगडला आली आणि आपल्या हिंदू मैत्रीणीकडे थांबली होती. त्यानंतर २९ सप्टेंबरला माही खानने त्या हिंदू मायलेकीला आपल्या घरी फिरायला घेऊन जात असल्याचे दीपकला सांगितले. तसेच सायंकाळी परत येण्यासाठी त्या दोघींना बसमध्ये बसवून देईल असेही तिने सांगितले.
माही शर्माची वागणूक चांगली वाटल्याने पत्नी आणि मुलीला तिच्यासोबत पाठवल्याचे दीपक शर्मा यांनी तक्रारीत सांगितले. मात्र, त्या दोन्ही मायलेकी सायंकाळपर्यंत घरी पोहोचल्या नाहीत. त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे दीपक शर्माने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.
माही खानच्या माध्यमातून आपली पत्नी एका मुस्लीम तरुणाच्या संपर्कात आली असून नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या पत्नीला फसवले असल्याचे दीपक शर्माकडून सांगण्यात येत होते. ते आपल्या पत्नीसोबत काहीतरी चुकीचे करणार असल्याचीही शंका त्यांनी वर्तवली होती. दरम्यान, या महिलेला शोधण्यात पोलिसांना यश आले असून ती सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.