शिखर धवनचा पत्नी आयशासोबत घटस्फोट; म्हणाला- 'माझा मानसिक छळ....'

05 Oct 2023 16:58:03
Shikhar Dhawan Divorce with Wife Ayesha Mukherjee

नवी दिल्ली : दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. आयशा शिखरचा मानसिक छळ करत असे, असे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यांची बदनामी करण्यासाठी अनेकांना अपमानास्पद संदेश पाठवण्यात आले. लग्नानंतर भारतात राहण्याचे वचन पाळले नाही. याशिवाय मालमत्तेचे मालकी हक्क मिळविण्यासाठीही दबाव टाकण्यात आला,असे न्यायलयाने नमुद केला आहे.

दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश हरीश कुमार यांनी धवनला त्याच्या आरोपांच्या आधारे घटस्फोट मंजूर केला. यापैकी अनेक आरोपांवर आयशाने स्वतःचा बचाव केला नाही आणि ती अपयशी ठरली. शिखर धवन ह्याचा त्याच्या पत्नीकडून सतत मानसिक छळ करत असल्याचे न्यायालयाने मान्य केले. यात शिखर धवनला त्याच्या मुलाला भेटू न देणे आणि त्याला ऑस्ट्रेलियात वर्षानुवर्षे त्याच्यापासून दूर ठेवण्याचाही समावेश आहे.

शिखर धवनने २०१२ मध्ये घटस्फोटित आयशा मुखर्जीसोबत लग्न केले. आयशाला तिच्या पुर्वीच्या पतीपासून दोन मुली आहेत त्या ऑस्ट्रेलियात तिच्यासोबत राहतात. २०२१ मध्येच या जोडप्याच्या नात्यात तणाव सुरू झाला.आयशा ही ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. शिखर धवनसोबत तिला आठ वर्षांचा मुलगा आहे. तोही आपल्या आईसोबत ऑस्ट्रेलियात राहतो. लग्नानंतर शिखर आयशाच्या पुर्वीच्या पतीच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्चही उचलत होता. त्याने आयशासाठी ऑस्ट्रेलियात काही मालमत्ताही खरेदी केली होती. शिखर धवनने न्यायालयात सांगितले की, लग्नाच्या वेळी दिलेल्या वचनाच्या विरोधात, त्याची पत्नी त्याच्यासोबत भारतात राहिली नाही आणि आपल्या मुलालाही घेऊन ऑस्ट्रेलियाला गेली.

एका अहवालानुसार, कोर्टाने म्हटले आहे की, “आयशाचा दावा आहे की तिला भारतात राहायचे आहे. पण आपल्या मुलींप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना ऑस्ट्रेलियात राहावे लागले. त्यामुळे ती भारतात राहिली नाही. यावरून तिने लग्नाच्या वेळी दिलेल्या वचनावर माघार घेतल्याचे स्पष्ट होते. "यामुळे धवनला नात्यातील दुरावा आणि वर्षानुवर्षे स्वत:च्या मुलापासून विभक्त होण्याच्या अपार वेदनांना सामोरे जावे लागले."
 
शिखरने कोर्टात असेही सांगितले आहे की, लग्नानंतर आयशाने ऑस्ट्रेलियातील स्वतःच्या पैशाने खरेदी केलेल्या तीन मालमत्तांमध्ये ९९% हिस्सा घेतला आणि इतर दोन मालमत्तांमध्ये स्वतःला भागीदार बनवले. शिखर धवनला त्रास देण्याच्या आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने आयशा त्याच्या सहकारी खेळाडूंना आणि त्याच्या आयपीएल संघाच्या मालकांना अपमानास्पद संदेश पाठवत असे. मात्र, पोटगी वेळेवर मिळावी या उद्देशाने हे कृत्य केल्याचे आयशाने सांगितले. या सर्व बाबींचा आधार घेत न्यायालयाने शिखरची घटस्फोटाची याचिका मान्य केली.

धवन आणि आयशा यांच्या मुलाच्या कायमस्वरूपी कोठडीबाबत कोणताही आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. धवनला त्याच्या मुलाची भेट घेण्याचा आणि भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वाजवी कालावधीसाठी व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी संवाद साधण्याचा अधिकार देण्यात आला आहे.



Powered By Sangraha 9.0