लाल बहादूर शास्त्री यांचे बहुमोल योगदान दुर्लक्षित केले - मकरंद मुळे

    04-Oct-2023
Total Views |

makrand mule


ठाणे :
देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ज्यांच्या गूढ मृत्यूचे सत्य अजूनही उजेडात आलेले नाही. त्यांचे देशाच्या जडणघडणीतील योगदान दुर्लक्षित केले. लाल बहादूर शास्त्री यांनी हिंदी विरोधी आंदोलन, धान्य टंचाई आणि १९६५ चे पाकिस्तानने लादलेले युद्ध प्रभावीपणे हाताळले होते. मात्र, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेतली नाही; असे प्रतिपादन पत्रकार, लेखक,राजकीय सामाजिक चळवळीचे विश्लेषक मकरंद मुळे यांनी केले. रोटरी क्लब ठाणे तर्फे लाल बहादूर शास्त्री यांच्या एकशे एकोणिसाव्या जयंती निमित्त मंगळवारी आयोजित व्याख्यानात मकरंद मुळे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ठाणे, नौपाडा येथील सहयोग मंदिर सभागृहात आयोजित व्याख्यानात व्यासपीठावर रोटरी क्लब ठाणेचे अध्यक्ष आनंद काळे, सचिव मनिष पाटील होते.

लाल बहादूर शास्त्री व्यक्ती आणि कार्य या विषयावर बोलताना मकरंद मुळे म्हणाले, जय जवान, जय किसान या घोषणेने शेतकरी आणि सैन्याचे मनोबल वाढवले. शेतकरी आणि सैनिकांना गौरवांकीत केले. धान्य टंचाईवर मात करून स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांतीला चालना देताना, सर्वसामान्यांना आठवड्यातून एकवेळ उपासाचे आवाहन केले होते. स्वतःपासून त्याची सुरुवात केली होती. यातून लोकसहभाग वाढवला. भारतीयांना राष्ट्रीय कामात सहभाग देण्यासाठी प्रेरणा दिली. श्वेतक्रांतीला पाठबळ देऊन सहकारी तत्वावर दुग्ध व्यवसायाची गती वाढवली होती.

भारताला दुबळे समजून आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानाचा पराभव करून पाठिंबा देऊन देशाच्या सामर्थ्याचा परिचय दिला होता. लाल बहादूर शास्त्री यांनी उत्तर प्रदेश मंत्री मंडळात परिवहन मंत्री असताना महिला कंडकटर नियुक्त केल्या होत्या. धार्मिक, जातीय दंगली समर्थपणे हाताळल्या होत्या. केंद्रीय रेल्वे मंत्री असताना लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर मंत्रीपदाचा राजीनामा देऊन राजकारणात आदर्श स्थापित केला आहे. घुसखोरी समस्या सुटावी यासाठी लाल बहादूर शास्त्री प्रयत्नशील होते. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि लाला लजपतराय राय यांचा लाल बहादूर शास्त्री यांच्यावर प्रभाव होता; असे सांगून मकरंद मुळे पुढे म्हणाले, समाजवादी विचाराने प्रेरित असलेले लाल बहादूर शास्त्री भारतीय अर्थव्यवस्था बंदिस्त नसावी अश्या मताचे होते. वयाच्या सतराव्या वर्षी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांनी तीन वेळा कारावास भोगला होता. तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र याची यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या लाल बहादूर यांची शैक्षणिक कामगिरी लक्षात घेऊन त्यांना शास्त्री म्हणून ओळखले जाऊ लागले.

लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात राष्ट्र प्रथम अश्या धोरणाने देशाचा सन्मान वाढवला होता. साधेपणा, खरेपणा, समर्पण भाव ही लाल बहादूर शास्त्री यांची ओळख होती. शालीन, विनयशील असलेले लाल बहादूर शास्त्री देशहितासाठी खंबीर होते. लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिकता जपली होती. उक्ती आणि कृती यात समानता ठेवणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांनी राजकारणात एक वेगळा मापदंड स्थापित केला आहे. लाल बहादूर शास्त्री यांचे स्मरण प्रेरणादायी असून, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवन कसे जगावे याचा वस्तुपाठ घालून देणारे आहे, असे मकरंद मुळे यांनी आपल्या भाषणात शेवटी सांगितले. रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद काळे यांनी प्रास्ताविक केले. सचिव मनीष पाटील यांनी विविध रोटरी क्लबच्या माहिती दिली. रोटेरियन काणे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाला रोटरी क्लब ठाणेचे सदस्य तसेच दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा.वा.दाते, रा.स्व.संघाच्या छत्रपती शाखेचे कार्यवाह शरद बर्वे, भावे प्रतिष्ठानचे प्रदीप भावे यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. महिलांची संख्या उल्लेखनीय होती. रोटरी क्लब ठाणे हा १९५८ पासून कार्यरत आहे. आरोग्य, शिक्षण यासह विविध प्रकल्प चालवत आहे. सामाजिक कामात रोटरी क्लब ठाणे दीर्घकाळ सक्रिय आहे.