अहवाल: चीनने अमेरिकेसाठी विणलं जाळं; पण पाणबुडीत जीव गुदमरून ५५ चिनी खलाशांचाच झाला मृत्यू?

04 Oct 2023 20:51:21
55 Chinese sailors killed after nuclear submarine accident in August

बीजिंग : चीनमध्ये अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुडीत ऑक्सिजन संपल्याने गुदमरल्याने चिनी खलाशांचा मृत्यू झाला. ब्रिटिश गुप्तचर अहवालाचा हवाला देत ‘द मिरर’ या वृत्तपत्राने हा दावा केला आहे. या दुर्घटनेत ५५ चिनी खलाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चीनची पाणबुडी नौदलाच्या जाळ्यात अडकली. हे जाळे अमेरिकन आणि ब्रिटिश जहाजांना अडकवण्यासाठी विणण्यात आले होते. ही घटना ऑगस्ट महिन्याची आहे. हे सर्व दावे मिररने ब्रिटिश गुप्तचर अहवालाद्वारे केले आहेत.

ज्या खलाशांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते खलाशी पाणबुडी ०९३-४१७ वर तैनात होते. घटनेच्या वेळी पाणबुडी पिवळ्या समुद्रात होती. ही पाणबुडी अडचणीत आल्याच्या आणि त्यावर तैनात खलाशांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताचे चीन सरकारने खंडन केले आहे.ब्रिटिश अहवालात सांगण्यात आले की, , “२१ ऑगस्ट २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:१२ वाजता या पाणबुडीमध्ये अपघात झाला. त्यावेळी ती पिवळ्या समुद्रात तिच्या मोहिमेवर होती. या घटनेत ५५ खलाशांचा मृत्यू झाला. या नौसैनिकांमध्ये २२ अधिकारी, ७ कॅडेट अधिकारी, ९ छोटे अधिकारी आणि १७ नाविकांचा समावेश होता.

अहवालात पुढे म्हटले आहे की, “मृत्यू झालेल्या खलाशांमध्ये या पाणबुडीचा कॅप्टन जु-योंग-पेंग यांचा समावेश आहे. तसेच या अहवालानुसार सांगण्यात आले की, पाणबुडीमध्ये ऑक्सिजनची कमतरता होती, ज्यामुळे त्या सर्वांचा मृत्यू झाला. पाणबुडी मूरिंग अँकर आणि साखळ्यांवर आदळली, तिच्या अनेक यंत्रणांचे नुकसान झाले आणि दुरुस्तीसाठी ६ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे पाणबुडीच्या आत विषारी हवा पसरली आणि लोक मरण पावले.

ज्या पाणबुडीवर हा अपघात झाला ती टाईप ०९३ पाणबुडी होती. ही पाणबुडी चालत असताना फारच कमी आवाज होतो, त्यामुळे शत्रू त्यांना सहज पकडू शकत नाहीत. ही पाणबुडी चिनी नौदलाच्या आधुनिकीकरणाचा एक भाग आहे. ती अणुइंधनावर चालते.ही बातमी खरी असली तर अलीकडच्या काही वर्षांतील हा सर्वात भीषण लष्करी अपघात असेल. मात्र, चीनने हा अहवाल पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले असून अशा कोणत्याही घटना घडल्यापासून नकार दिला आहे. ब्रिटिश गुप्तचर संस्थेनेही या अहवालावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.



Powered By Sangraha 9.0