नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी फंडिंग प्रकरणी न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी केली आहे. दरम्यान, न्यूजक्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना UAPA कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रबीर पुरकायस्थ यांना बुधवारी दिल्ली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच छापेमारीनंतर न्यूजक्लिकचे कार्यालयही सील करण्यात आले आहे. मंगळवारी न्यूजक्लिकशी संबंधित संशयित ३७ पुरुष आणि ९ महिलांच्या घरावर छापा टाकून चौकशी करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
यावेळी त्यांचे लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रेही तपासणीसाठी जप्त करण्यात आले. २०२१ मध्ये ईडीने न्यूजक्लिकला मिळत असलेल्या बेकायदेशीर निधीबद्दल गुन्हा दाखल केला होता. ईडीच्या तपासात ३ वर्षांत ३८.०५ कोटी रुपयांचे बनावट विदेशी फंड व्यवहार उघड झाले होते.
त्याआधारे आता दिल्ली पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. चीनमधून आलेला पैसा काही परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून न्यूजक्लिकपर्यंत पोहोचला. तसेच न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकारांनाही हेच पैसे देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.