मराठा आरक्षण : मुंबईत मराठा आरक्षणासाठी मुंडन आंदोलन
31 Oct 2023 11:59:40
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चिघळला असून त्याने आता हिंसक रुप धारण केले आहे. राज्यभरातील मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुढे येत आहे. यातच आता मुंबईत मराठा आरक्षणासाठी मुंडन आंदोलन करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर असून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलकांकडून वेगवेगळ्या युक्त्या लढवण्यात येत आहे. मुंबईच्या घोडकदेव परिसरात आंदोलकांकडून मुंडन आंदोलन करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटलांना आमचा पाठींबा असल्याचे या आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी एक समितीही गठित करण्यात आली आहे.
मात्र, ३० ऑक्टोबर रोजी या आंदोलनाने हिंसक रुप धारण केले. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी यावर प्रतिक्रिया देत मराठा समाजाने शांततेत आंदोलन पार पाडावे असे म्हटले आहे.