तेल अवीव : इस्रायलने उत्तर गाझा रिकामा करण्याचे आदेश दिल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून दक्षिण गाझामध्ये मदत पोहोचत आहे. ही मदत एकतर हमासच्या लोकांकडून किंवा गाझामधील रहिवाशांकडून लुटली जात आहे. आता समोर आलेल्या बातम्यांनुसार, गाझा पट्टीमध्ये जमावाने संयुक्त राष्ट्रांच्या गोदामांची लूट सुरू केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण गाझा पट्टीतील रफाह येथील संयुक्त राष्ट्रांच्या गोदामात हजारो लोक घुसले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर लुटमार केली. यावेळी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी काम करणाऱ्या युनायटेड नेशन्स रिलीफ एजन्सी (यूएनआरडब्लूए) ने सांगितले की गहू, पीठ आणि इतर मूलभूत पुरवठा असलेली अनेक गोदामे लुटली गेली आहेत.
हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १४०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर इस्रायलने हमासविरुद्ध केलेल्या कारवाईत आतापर्यंत ७५०० पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल दहशतवादी हमासला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सैन्य कारवाई चालू ठेवणार आहे, अशी माहिती इस्रायलच्या सरकारने दिली आहे.