एक ध्यासपर्व

30 Oct 2023 16:16:47
Article on Mohanrao Dhavalikar Written By Shrinivas Gokhale

काका म्हणाले होते, “घरी येणारच तुझ्या.” पण, आता कधी हा प्रश्न सतत मनाला भेडसावत आहे. ते स्वतःच नसल्याने सगळेच अनुत्तरीतच राहिले. त्यांचा कायम हसतमुख असलेला चेहरा कायम डोळ्यांसमोर येतो. त्यांना शेवटचं पण भेटता आणि पाहता न आल्याचं शल्य कायम मनात राहील.

ते आता नाहीत, यावर विश्वास बसतच नाही. त्यांचा माझा परिचय २०१९ पासूनचा. जानेवारी २०१९ मध्ये ठाण्यातील एका कवी संमेलनाला त्यांची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली. तेव्हा त्यांनी ‘नवी मुंबई साहित्य परिषदे’बद्दल मला माहिती दिली. त्यांनी मला त्यांच्या ‘नवी मुंबई साहित्य परिषदे’च्या काव्य संमेलनाला आमंत्रित केलं आणि अशा प्रकारे मी नवी मुंबईमध्येही काव्यसंमेलन, अभिवाचन यासाठी जाऊ लागलो. इथेच माझा संपर्क काकांच्या तालमीत तयार झालेल्या धडाडीच्या कल्पना देशमुख काकूंशी आला. लोकांचा पुस्तकांचा प्रचंड संग्रह असतो, पण माणसांचासुद्धा भरपूर संग्रह असलेली व्यक्ती मी ढवळीकर काकांच्या रूपात पाहिली. पहिल्या भेटीपासून ते नवी मुंबईच्या पहिल्या कार्यक्रमापर्यंत त्यांना अगदी फोनवरही ’सर’ म्हणायचो. नंतर त्यांनीच ’मला नुसतं काका म्हण’ असं सांगितलं. ते मी अगदी कायमचं लक्षात ठेवलं. त्यांना साहित्याविषयी इतकी कळकळ होती. त्यासाठी ते सगळीकडे फिरायचे. नुसते फिरायचे नाहीत, तर स्वतः कुठलंही काम करायला कायम पुढे असायचे.

अडचण किंवा परिस्थिती कशीही असो, त्याकडे फारसं लक्ष न देता, साहित्यासंबंधी कार्यावरून लक्ष अजिबात विचलित होऊ द्यायचं नाही, हे त्यांच्याकडून शिकता आलं. प्रचंड ओळखी! इतक्या की, त्यांचं नुसतं नाव सांगूनही कामं झाली आहेत. यावरून हे लक्षात आलं की, फक्त सरकारी माणूस किंवा राजकीय व्यक्तींचीच मदत घ्यावी लागते असं नाही, तर अशा सर्व क्षेत्रांतील लोकांशी दांडगा जनसंपर्क असलेल्या साहित्यिकांमुळेही काम होऊ शकतं.

त्यांनी कोणतीही गोष्ट एकदा ठरवली की, ते अगदी झोकून दिल्यासारखे झपाट्याने काम करायचे. घेतलेली जबाबदारी अगदी नेटाने पार पाडायची, हे त्यांच्या रक्तातच! उत्साह तर काय त्यांचा कमालीचा प्रेरणादायी होता. समोरच्याला ते अगदी पाच मिनिटे जरी भेटले तरी त्याच्या समोरची व्यक्ती खूप काही शिकून जाणारच. नियोजन, कार्यक्रम रूपरेषा, लेख, काव्य अचूक मांडणी योग्य ठिकाणी समारोप अशा सर्वच गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या. ’शब्द संवाद’ या त्यांच्या अंकासाठी कायम ते लेख किंवा कविता मागवून घ्यायचे. ते स्वतःच त्याचे उत्तमप्रकारे संपादन करत असत. नवीन माणसांना लिहून निवेदन करायला लावणं, विद्यार्थ्यांना सादरीकरणासाठी संधी देणं, त्यांना आपल्यात सामावून घेणं यात त्यांचा हातखंडा होता.

त्यांच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, साहित्य विषय सोडूनही ते अनेक बाबतीत अनेकांना मदत करायचे. अगदी माझ्यासमोर घडलेला प्रसंग आहे. एका काव्य उपक्रमात एक बाई आलेल्या. त्यांच्याशी बोलता बोलता ढवळीकर काकांना कळलं की, त्यांच्या अमेरिकेत असलेल्या मुलासाठी लग्नाचं बघत आहेत. काकांनी त्यांना लगेच सांगितलं, ’‘त्याचे डिटेल्स मला पाठवून ठेवा, मी माझ्या परिचयातल्या सगळ्यांकडे पाठवतो. काळजी करू नका तुम्ही, मीही दोन मुलींचा वडील आहे, तुमची काळजी समजू शकतो. पण मी आत्तापर्यंत अनेकांना स्थळं सुचवली आहेत आणि त्यामुळे अनेकांची ओळखीत लग्न जमवली गेली आहेत.” हे ऐकून मला एक गोष्ट लक्षात आली की, नुसता साहित्याचाच नव्हे, तर माणुसकीचा वसा घेतलेले हे असामान्य व्यक्तिमत्त्व आहे.

अगदी आत्ता अलीकडच्या दीड वर्षांत मधल्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीनंतर पुन्हा भेटण्याचा त्यांना योग आला. ते म्हणजे पत्रकारिता करताना. पण, दुर्दैवाने त्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, त्यात मी नव्हतो. म्हणजे होतो मुंबई विद्यापीठाच्याच अंतर्गत फक्त आमची दोन वेगवेगळी महाविद्यालये होती. माझं मुंबई युनिव्हर्सिटीमधलं गरवारे, तर त्यांचं पनवेलचं रामशेठ ठाकूर कॉलेज. दोन्हीकडे शिक्षकसुद्धा बर्‍यापैकी तेच होते. अभ्यासक्रमसुद्धा तोच आणि फक्त परीक्षा मागे-पुढे. माझा ऑफिसमुळे लेक्चरला न जाता आल्याने माझं एक महत्त्वाचं लेक्चर गेलं. पण, आमच्या दोन्हीकडच्या मुख्य असलेल्या ज्यांना शिक्षकी पेशा आणि आईची माया याचा समतोल कसा राखावा, हे बरोबर जमतं. त्या प्रा. नम्रता कडू मॅडमने मला ढवळीकर काकांच्या बॅचला बोलवून घेतलं.

ते लेक्चर माझं त्यांच्यासमवेत झालं. तोही एक वेगळाच अनुभव होता. ढवळीकर काका तेव्हाही घरून डबा घेऊन आले होते. मलाही चांगलं आठवतं की, कडू मॅडमने मशरूमची भाजी आणलेली. मीसुद्धा घरून इडली आणि डोसे करून नेले होते. ते सर्वही काकांनी अगदी आवडीने खाल्ले. का माहिती नाही, पण गरवारेपेक्षा त्या एक दिवसात त्या बॅचमधल्या सहा विद्यार्थ्यांमध्ये मी जास्त रमलो. या बॅचमध्ये जास्त आपलेपणा जाणवला, प्रेम जाणवलं. त्यांच्यातल्या हुशार विद्यार्थिनी वंदना मत्रे यांना भेटलो. ’त्यांच्याकडूनच मीसुद्धा शिकले, शिकतेय आणि पुढे शिकत राहीन,’ असं त्या मला म्हणाल्याचं आजही आठवतं. इतकंच नव्हे, तर स्वतः कडू मॅडमदेखील त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत होत्या. याच शैक्षणिक वर्षात काकांच्या सौभाग्यवतींचं अकाली निधन झालं. तेव्हा आमच्या कडू मॅडम, वंदना यांच्यासह ढवळीकर काकांच्या घरी जाण्याचा पहिल्यांदाच योग आला. काकांच्या घरी अशा पद्धतीने पहिल्यांदाच जाणं मनाला फार पटलं आणि मुळीच आवडलं नव्हतं.

याच शैक्षणिक वर्षात त्यांना पचनाचा पुढे त्रास सुरू झाला होता. परीक्षेवेळी त्यांनी कोणत्या परिस्थितीत प्रबंध पूर्ण करून दिला आणि कशा अवस्थेत परीक्षा दिली, हे एक खरोखर दिव्यच आहे. पत्रकारितेचे ते वर्ष त्यांनी अशा प्रकारे पूर्ण केले. त्या ऐन सत्तरीतही त्यांची शिकण्याची उमेद तसूभरही कमी झाली नव्हती. त्यांना तेव्हा म्हटलं होतं, “काका, तुमच्या पंच्याहत्तरीला तुमच्यावर मस्तपैकी पुस्तक प्रकाशित करायचं. ज्यामध्ये तुमच्या परिचयातील लोकांची तुमच्याबद्दलची आस्था शब्दबद्ध असेल.” तेव्हा ते म्हणाले होते, ’‘सगळ्यांचं घेणं अवघड आहे, पण तरीही बघू कसं होतंय.” त्या वाक्यांचा आज संदर्भ लागतोय. त्यांना तेव्हाच कल्पना होती का? की ते पत्नीवियोगाने खचले होते, पण दाखवत नव्हते? सौ गेल्यावरही आईला आणि बाबांना कसं सांगायचं, हा त्यांच्यासमोर मोठा पेचप्रश्न होता. त्यामुळे ते कायम बेळगावला जायचे.

त्यांनी त्यांच्या आजाराकडेही दुर्लक्ष करत दुखणं अंगावर काढलं का? काका म्हणाले होते, “घरी येणारच तुझ्या.” पण आता कधी, हा प्रश्न सतत मनाला भेडसावत आहेत. त्यांचा कायम हसतमुख असलेला चेहरा कायम डोळ्यांसमोर येतो. त्यांना शेवटचं पण भेटता आणि पाहता न आल्याचं शल्य कायम मनात राहील. ज्यांच्या नावात ‘ढवळीकर’ असूनही कधीच कुठेही त्यांनी नको तिथे ढवळाढवळ केली नाही, पण त्यांच्या आकस्मित जाण्याने मन मात्र प्रत्येकाचंच पार अगदी ढवळून निघालं आहे. प्रत्येक गोष्टीचा ध्यास घेतलेले एक महा ध्यासपर्व लोप पावले! त्यांच्या ‘मोहन’ नावाप्रामणेच त्यांच्या सुंदर स्मृतिसुमनांचा सुगंध कायम आयुष्यभर मोहित करत साथ देत राहील.

श्रीनिवास विजय गोखले
९६१९९२०००१
gokhalearchit@gmail.com
Powered By Sangraha 9.0