नवी दिल्ली : चिनकडून वित्तपुरवठा होत असल्याचे आरोप असलेल्या न्यूजक्लीक या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित पत्रकारांवर मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली. यावेळी सायंकाळी न्यूजक्लीकचे कार्यालयदेखील सील करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर चीनी अजेंडा चालविण्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी न्यूजक्लीक या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित 30 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. यावेळी पोलिसांनी अभिसार शर्मा, उर्मिलेश, परोंजय गुहा ठाकुर्ता, प्रबीर पुरकायस्थ, भाषा सिंह, आनिंदो चक्रवर्ती, सोहेल हाशमी यांच्या निवासस्थानी सकाळीच छापेमारी करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी न्यूजक्लीकच्या कार्यालयासही टाळे ठोकले आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात अन्यांविरोधात युएपीए कलम १३, १६, १७, १८, आणि २२, भादंवि कलम १५३ (अ) (धर्म अथवा वंशाच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढविणे) या कलमांखाली गुन्हा दाखल केले आहेत.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मंत्री अनुराग ठाकूर यांनी या छापेमारीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या कारवाईवर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. कोणी काही चूक केली असेल तर तपास यंत्रणा त्यावर कारवाई करतात. बेकायदेशीरपणे पैसे घेतले असतील किंवा आक्षेपार्ह काम केले असेल, तर तपास यंत्रणा त्यावर कारवाई करू शकत नाही, असे कुठेही लिहिलेले नाही. तपास यंत्रणा स्वतंत्र असून त्या नियमांचे पालन करून कारवाई करत असल्याचे ठाकूर यांनी यावेळी म्हटले आहे.