मुंबई : लहान मुलांसाठीच्या मलेरियावरील दुसऱ्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजूरी मिळाली आहे. ऑक्सफोर्ड आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ही लस (R21/मॅट्रिक्स-M) तयार केली आहे. दरम्यान, मलेरिया रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली ही दुसरी लस असून याआधी जागतिक आरोग्य संघटनेने २०२१ मध्ये मलेरियाच्या RTS,S/AS01 या लशीला मंजूरी दिली होती. त्यामुळे आता जगात मलेरियावर दोन लशी उपलब्ध झाल्या आहेत.
दरम्यान, जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी ऑक्सफोर्डने दरवर्षी लशीचे १० कोटी डोस तयार करण्यासाठी करार केला आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीला मलेरिया झाल्यास संबंधित व्यक्तीस लशीचे चार डोस घ्यावे लागणार आहेत. पुढील वर्षी लस बाजारात उपलब्ध होणार असून एका डोसची किंमत १६६ ते ३३२ रुपये असणार आहे.