मुंबई : चीनमधील हांगझाऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कायम असून ५ हजार मीटर शर्यतीत भारताच्या पारूल चौधरीने सुवर्णपदक जिंकले आहे. पारुलच्या या सुवर्ण कामगिरीमुळे नवा इतिहास रचला गेला आहे. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली महिला धावपटू ठरली. पारुलच्या सुवर्ण कामगिरीनंतर भारताच्या खात्यात आतापर्यंत १४ सुवर्णपदके, २६ रौप्यपदके तर २७ कांस्यपदकांची भर पडली आहे.
पारूलने ५ हजार मीटर शर्यतीत देदीप्यमान कामगिरी केली असून तिचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक ठरले आहे. आदल्या दिवशी महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुलने रौप्यपदकाची कमाई केली होती. पारुल ९:२७:६३ च्या वेळेसह दुसऱ्या स्थानावर राहिली. दरम्यान, सुवर्णयशाद्वारे पारुल चौधरीने चीनमध्ये तिरंगा फडकावला. दरम्यान, पारुलने शेवटच्या ३० सेकंदात टेबल फिरवत सुवर्णपदक पटकावले.