संबळाची ‘मोहिनी’

    03-Oct-2023
Total Views |
Article On Sambal player Mohini Kishore Bhuse

उच्च शिक्षण घेत असताना पारंपरिक लोकसंगीताचा अभ्यास करून मोहिनी भुसे ही तरुणी ‘संबळवादक’ म्हणून जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याबाहेरही व्यासपीठ गाजवत आहे. तिच्याविषयी...

लोकसंगीताचा शास्त्रोक्त अभ्यास करून लोककलेचे वारसदार घडविण्यासाठी उच्च शिक्षणासह जिद्दीच्या जोरावर मोहिनी किशोर भुसे ही तरुणी संबळवादक म्हणून देशभर व्यासपीठ गाजवत आहे. इयत्ता सातवीपासून मोहिनी संबळ हे पारंपरिक वाद्य वाजवत आहे. परंतु, त्याच्याही अगोदरपासून तिला संगीताची प्रचंड आवड होती. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावात जन्मलेली मोहिनी सध्या पुण्यातील महाविद्यालयात मानसशास्त्र पदवीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असून तिच्या वडिलांचे हार्डवेअरचे दुकान आहे.

मोहिनीची आई गृहिणी असून, कुटुंबातील प्रत्येकाचा तिच्या या आगळ्यावेगळ्या क्षेत्रातील यशस्वी प्रवासात पाठिंबा आहे. कुटुंबात पारंपरिक वाद्य, संस्कृती किंवा लोकसंगीताचा कोणतीही पार्श्वभूमी नसली, तरी लहानपणापासूनच वाघ्या-मुरळी, जागरण-गोंधळ संबळ या लोककलेबाबतची आस्था तिच्या मनात रुजली. सातवीत असताना शालेय कार्यक्रमात संबळवादन करणार्‍या एका मैत्रिणीच्या घरून विरोध झाल्यावर गुरुजींनी मोहिनीला वादनाची संधी दिली. घरातल्या प्रत्येकाची साथ मिळाली अन् लोकसंगीत तिच्या अंगात भिनले. अनेक गोंधळ कार्यक्रमात वाजणारे संबळ वाद्य तिच्या मनाला भुरळ घालू लागले आणि सुप्रसिद्ध ढोलकीवादक गणेश डोकबाणे यांच्याकडे तिने वादनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. सातवीत शिकताना वैयक्तिक वाद्य स्पर्धेत तिने संबळवादन केले, त्या स्पर्धेतून मिळालेल्या प्रेरणेतून लोककला जिवंत ठेवावी, या उद्देशाने मोहिनी या क्षेत्राकडे वळाली.

मोहिनी सांगते की, “संबळ ही कला बर्‍यापैकी लोकांना अद्याप ज्ञात नाही, त्यामुळे मी संबळ शिकल्यानंतर जागोजागी या कलेचे सादरीकरण केले.” त्यातच तिने सोशल मीडियाचाही पुरेपूर आधार घेतला. त्यातून मिळालेल्या प्रतिसादाला सकारात्मकता दर्शवित अनेकांना ती संबळ वादन शिकवत आहे. हे सर्व आत्मियतेने करत असताना प्रारंभी तिला अनेक नकारात्मक विचारांना सामोरे जावे लागले. अनेकदा तिला ‘संबळ वाजवू नको, हे मुलींचे काम नाही,’ असे सल्ले दिले गेले. मात्र, मोहिनीने अशा अनेक प्रश्नांना दुर्लक्षित करत तिचे संबळ वादन सकारात्मकतेने सुरूच ठेवले. विशेष म्हणजे, या सर्वांत तिच्या कुटुंबीयांचे तिला भक्कम पाठबळ लाभले.

तिचे अनुभव कथन करताना ती सांगते की, “२०१९-२० मध्ये पुण्याच्या त्यांच्या महाविद्यालयील ग्रुपने गुजरातमध्ये एकत्रित ५० ते ६० वाद्य वाजविली होती. ग्रुप प्रमुख म्हणून मी संबळवादन केले होते. विशेष म्हणजे, सर्व प्रेक्षक हे महाराष्ट्राबाहेरील असल्याने त्यांना या वादनाबाबत अजिबात काहीच माहीत नव्हते. मात्र, जेव्हा प्रेक्षकांनी आमचे संबळवादन ऐकले, तेव्हा ते अक्षरश: भारावून गेले होते.” कार्यक्रम संपल्यावर गर्दी करून मोहिनीच्या या संबळ वाद्याबाबत विचारपूस करू लागले. हा क्षण तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला असल्याचे ती सांगते.

या क्षेत्राकडे नव्याने येणार्‍या तरुण-तरुणींना संदेश देऊ इच्छिते की, तिच्या वयातल्या तरुणींच सध्याचं आकर्षण इलेक्ट्रिक गिटार, ड्रम सेट, कीबोर्ड, व्हायोलिन, सॅक्सोफोन याबरोबरच पाश्चिमात्य वाद्यांकडे जास्त आहे. मात्र, या सार्‍या वाद्यांचा उगम हा भारतीय पारंपरिक वाद्य जसे तबला, ढोलकी, सितार, सारंगी, शेहनाई या वाद्यांपासूनच झाला आहे, हे विसरता कामा नये. संगीत, वाद्य शिकताना स्वतःला वेळोवेळी अद्ययावत ठेवाच. मात्र, आपल्या लोककलेलाही जागृत ठेवण्यासाठी प्रत्येक तरुण-तरुणीने माझ्यासारखा प्रयत्न केला पाहिजे.”

संबळवादनामुळे राज्याबाहेरही नाव होत असले, तरी यातून पैसा मिळावा हा उद्देश कधीच नसल्याचे मोहिनी आवर्जून अधोरेखित करते. परंपरागत संगीत आणि लोककला जीवंत राहावी, यासाठी आधुनिक जीवनाशी जुळवून घेत ती ही वादन परंपरा पुढे नेत आहे. पण, अनेकदा फक्त वादक म्हणून इतरांना या कलेपर्यंत आणण्यात येणार्‍या अडचणी दूर व्हाव्यात म्हणूनच पदवीची सांगड देत स्वतःला अधिक प्रबळ बनवतेय, जेणेकरून या क्षेत्रात उच्चशिक्षित वादकांचा सहभाग वाढून लोककला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल,” असे मोहिनी सांगते.

एक मुलगी म्हटली की, कुटुंबीयांच्या अनेक अपेक्षा असतात. उच्चशिक्षण ही काळाची गरज आहे. पण, लोकसंगीताची परंपरा कायम राहणे आणि त्याचा वारसा टिकणेही अत्यावश्यक आहे. त्यासाठीच उच्चशिक्षण घेताना परंपरा जपत असल्याचे मोहिने विशेषत्वाने सांगते. “माझ्यासारखेच अनेक वादक, विशेषतः तरुणींचा सहभाग वाढावा म्हणून कार्य करण्याचा मानस आहे,” अशी अपेक्षाही ती व्यक्त करते.

तेव्हा, अशा या तरुण संबळवादक मोहिनी भुसे हिला दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

गौरव परदेशी
८६०५७६८३६६