“मराठी बोलायला लाज वाटते का?”, सईने दिले सडेतोड उत्तर

03 Oct 2023 12:04:04

sai
 
मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतून आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या आघाडीवर आहे. सोशल मिडीयावर सक्रीय जरी असली तरी सई फारशी ट्रोलर्सना उत्तरं देत नाही. मात्र, यावेळी मराठी भाषा बोलण्याचा मुद्दा एकाने कमेंटमध्ये बोलल्यामुळे सईने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.  
नुकतंच सईने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. सईने एका इंग्रजी युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला काही प्रश्न विचारण्यात आले, ज्याची उत्तरे तिने इंग्रजीत दिली. मात्र सई यात इंग्रजी बोलत असल्याने काही चाहत्यांना ते खटकलं आणि सई मराठीत न बोलल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं. 
 
सईच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “मराठीत सांगितले असते तर पूर्ण समजले असते, English+Marathi= आमची गोची झाली बघा”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “मराठीमध्ये बोलले असते तर काय झाले आस्ते, आपल्या भाषेत बोलायला लाज वाटते?” असे एकाने म्हटले आहे. त्यावर सईने कमेंट करत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. “हे एक इंग्रजी चॅनेल आहे. तुम्ही आधी नीट माहिती मिळवा, त्यानंतर बोला. आणि आम्ही कोणत्या भाषेत बोलायचं हे ठरवण्याचा हक्क तुम्हाला नाही”, असे सई ताम्हणकरने थेट म्हटले आहे. तिच्या या उत्तरामुळे ट्रोलर्सची तोंडे अखेर बंद झाली आहेत.
Powered By Sangraha 9.0