रूग्णांसाठी देवदूत तू...

29 Oct 2023 21:23:11
Article on Doctor Rajesh Bhoir

गरीबीचे चटके सहन करीत वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉ. राजेश भोईर हे कर्करोग आणि डायलेसिस रुग्णांना मोफत उपचार देत जगण्याचे बळ देत आहे. त्यांच्यासाठी सर्वस्वी देवदूत ठरलेल्या डॉ. राजेश भोईर यांच्या जीवनप्रवासीविषयी... 
 
ठाणे जिल्ह्यातील सरवली गावातील एका छोट्या शेतकरी कुटुंबात राजेश यांचा जन्म झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांना प्रचंड मेहनत करावी लागायची. मग काय, अगदी कळत्या वयापासून राजेश हेदेखील काम करून आई-वडिलांना हातभार लावू लागले. त्यासाठी त्यांनी वेळप्रसंगी भाजीपाला विकला, तर कधी कम्पाऊंडर म्हणून नोकरी केली. राजेश यांचे शालेय शिक्षण सरवली पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. सरवलीसारखे छोटेसे गाव. त्यात त्यांच्या कुटुंबांचे उत्पन्नही अगदी जेमतेम. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात शिक्षणाविषयी फारशी आस्था नसताना राजेश यांनी घेतलेली झेप त्यांच्यामधील जिद्दच दाखवून देते.

डॉ. राजेश पाचवीमध्ये शिकत असताना, त्यांच्याच कुटुंबांमधील एक चुलत भाऊ डॉक्टर झाला. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून राजेश यांनीही मग चुलत भावाच्या सोबतीने कम्पाऊंडर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हा अनुभव त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. कम्पाऊंडर म्हणून काम करीत असतानाच, त्यांच्यात वैद्यकीय शिक्षणाविषयी आवड निर्माण झाली. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यासाठी विचार करत असतानाच ‘एमबीबीएस’चे शिक्षण आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने राजेश यांच्या लक्षात आले. यामुळेच त्यांनी ‘बीएएमएम’ करण्याचे निश्चित केले. शिक्षणादरम्यान राजेश यांना उत्तम शिक्षकांचा सहवास लाभला. या शिक्षकांकडून त्यांना डॉक्टरी पेशामध्ये आवश्यक असलेल्या नैतिकतेची शिकवण ही मिळाली.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन राजेश हे पुन्हा आपल्या गावी परतले. पण, खिसा रिकामा असल्याने आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यांना फार मेहनत करावी लागणार होती. राजेश यांनी परिसरात पायपीट करीत रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या फिरत्या दवाखान्याला काही प्रस्थापित डॉक्टरांनी विरोध दर्शविला. यानंतर त्यांनी पदव्युत्तर प्रशिक्षण घेण्याचे निश्चित केले. पुढे त्यांनी ‘एमएस’, ‘एमबीए’ पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले.

दि. २६ डिसेंबर २०१५ रोजी राजेश यांनी १५ खाटांचे ‘प्राणायू’ रुग्णालय सुरू केले. रुग्णालय उभारणीत राजेश यांना त्यांचे बंधू रोहिदास भोईर यांनी मदत केली. अवघ्या दोन वर्षांत या रुग्णालयाने ५० खाटांचा टप्पा गाठला. या रुग्णालयांमध्ये अवघड शस्त्रक्रिया केल्या जातात. अवघड शस्त्रक्रियेसाठी राजेश यांचा नावलैकिक आहे. विनोद सांबरे यांची एका अपघातात कवटी फुटून मेंदू बाहेर पडला. डॉ. राजेश आणि त्यांच्या पथकाने विनोदवर उपचार करून त्यांना जीवदान दिले आहे. डॉक्टर म्हणून यशाकडे वाटचाल करताना राजेश यांनी ठाणे ग्रामीण भागात विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून तसेच संस्थांच्या सहकार्याने डायलिसिस सेंटर सुरू केले. त्याचप्रमाणे कर्करोगग्रस्त रुग्णांना मदतीचा हात देत मोफत केमोथेरपीची व्यवस्था उपलब्ध करून दिली.
 
कर्करोगग्रस्त रुग्णांना उपचारांसाठी टाटा रुग्णालयात जावे लागते. त्याठिकाणी अनेकदा रुग्णांना उपचारांसाठी प्रतीक्षा करावी लागते. काही वेळेला एखाद्या रुग्णाला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचार मिळेपर्यंत विलंब होत असल्याने आजार वाढतो. खासगी रुग्णालयात हे उपचार खर्चिक असतात. त्यामुळे गोरगरिबांना उपचार घेणे शक्य होत नाही. अनेकदा रुग्ण दगावतात. गरीब परिस्थितीतून डॉक्टर झालेल्या राजेश यांना ही गोष्ट मनाला चटका लावणारी होती. सामाजिक बांधिलकीतून या रुग्णांसाठी काहीतरी करायचे, यांचा विचार करून त्यांनी प्राणायू रुग्णालयात डायलेसिस आणि केमोथेरपी हे उपचार मोफत देण्यास सुरूवात केली. २०१८ पासून आतापर्यंत हजारो रुग्णांवर केमोथेरपी उपचार मोफत करण्यात आले आहेत. कर्करोगावर उपचार म्हणून केली जाणारी रेडीएशन अद्यापपर्यंत रुग्णालयात होत नाही. पण, सर्व सुविधा एकाच रुग्णालयात रुग्णांना मिळाव्यात, असा मानस असल्याचे ही राजेश यांनी सांगितले.
 
‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून राजेश खेडोपाड्यात आणि वनवासी पाड्यात सेवा देत आहेत. राजेश हे ‘रोटरी क्लब’च्या सहप्रांतपाल पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची शैली आणि सातत्य पाहून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी वनवासी व दुर्गम भागातील लोकांच्या दारोदारी जाऊन वैद्यकीय सुविधा देण्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. राजेश यांच्यावर सोपविली. भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्षपद ही राजेश यांना देण्यात आले आहे. याशिवाय खेड्यापाड्यात वस्त्रदान, अन्नदान, फराळ वाटप केले जाते. ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने प्लास्टिक सजर्रीमधील विशेष कौशल्याबाबत त्यांना पुरस्कृत केले आहे.

आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल ’बेस्ट हेल्थ केअर इंटरप्रिन्युअर ऑफ महाराष्ट्र’ म्हणून त्यांना गौरवण्यात आले. ‘बेस्ट डॉक्टर ऑफ कम्युनिटी’ म्हणून ही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. कर्करोग आणि किडनी यांवरील आजारांचे प्रमाण वाढत असल्याने, या विषयात अधिकाधिक संशोधन करण्याचा राजेश यांचा मानस आहे. सामाजिक बांधलिकी जपणार्‍या या वैद्यकीय सेवाव्रतीला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0