मुंबई : सर्वत्र कोजागिरी पौर्णिमा खूप उत्साहाने साजरी केली जाते. मात्र यावर्षी कोजागिरी पौर्णिमेसोबत खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे अनेकांना प्रश्न आहे की, पौर्णिमा साजरी करावी की नाही? खंडग्रास चंद्रग्रहण असले तरी कोजागिरी पौर्णिमा मध्यरात्री साजरी करण्यास काही हरकत नाही, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
शनिवारी कोजागिरी पौर्णिमेसोबत खंडग्रास चंद्रग्रहण असले तरी मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणास प्रारंभ होणार असून रात्री १ वाजून ४४ मिनिटांनी ग्रहणमध्य आहे. त्यावेळी ६ टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येणार आहे. तर उत्तर रात्री २ वाजून २३ मिनिटांनी ग्रहण संपेल. यापूर्वी २००४ मध्ये कोजागिरीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग आला होता.
खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी पुढील काळातील ग्रहणाबद्दल माहिती देताना सांगितले की, २०२४ मध्ये एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही आहे. तर ७ सप्टेंबर २०२५ मध्ये खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल. महत्त्वाचे म्हणजे कोजागिरीच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असा योग १८ ऑक्टोबर २०३२ रोजी पुन्हा येणार आहे.