महाराष्ट्राची सत्वधारा असलेल्या वारकरी संप्रदायाचे भूषण, अध्वर्यू हभप बाबामहाराज सातारकर हे विठ्ठल भक्ती व प्रेमबोधाचे अत्यंत रसाळ आणि तेवढेच प्रभावी प्रवक्ते होते. निरूपणकार म्हणून ते ख्यातकीर्त होते. त्यांचे कीर्तन म्हणजे कीर्तन कलेचा पूर्णावतार होता. ज्ञान, भक्ती, प्रेम आणि बोध यांचा अपूर्व प्रयाग संगम होता. त्यांनी अविरतपणे ६० वर्षे सातारकर फडाची धुरा सांभाळत, पंढरीच्या पायी वारीत प्रेमबोधाचे अमृतसिंचन केले. पू. बाबामहाराजांचा निकटचा सहवास आणि संवादसुखाचा भाग्ययोग लाभलेले, संतसाहित्याचे उपासक-अभ्यासक विद्याधर ताठे यांनी वाहिलेली भावांजली!
नाचू कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लावू जगी॥
- संत नामदेव
पारमार्थिक समता, समरसता आणि आध्यात्मिक मानवतावादी विश्वात्मक उदात्त दृष्टी ठेवून महाराष्ट्रातील संत निवृत्तीनाथ ते संत विनोबा, गाडगे महाराज यांच्यापर्यंतच्या अविरत संतपरंपरेने केलेले कार्य ऐतिहासिक स्वरुपाचे आहे. त्या महान ईश्वरी कार्याचा वसा आणि वारसा पुढे ’वारकरी फड’ परंपरेने जतन व संवर्धन केला. त्या प्रमुख फडांमध्ये वै. दादामहाराज सातारकर यांच्या फडाचे योगदान अपूर्व आहे. हभप बाबामहाराज सातारकर हे त्या फडाची गेली ६० वर्षे समर्थपणे धुरा सांभाळीत होते. रसाळ कीर्तनकार, प्रभावी प्रवचनकार आणि भक्ती प्रेमबोधाचा प्रवक्ता म्हणून बाबामहाराज सर्वत्र विख्यात होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय एका प्रभावी प्रवक्त्याला प्रचारकाला मुकला आहे. संतांचे निधन हे दुःखद नसते, त्यांचे पुण्यस्मरण सदैव प्रेरणादायी असते. पू. बाबामहाराजांचे कार्य व पुण्यस्मरण असेच अनेक पिढ्यांना दीपस्तंभासारखे भक्तिमार्गावर मार्गक्रमण करण्यास प्रेरक ठरेल.
बाबामहाराज हे थोर कीर्तनकार, निरूपणकार होतेच; पण त्यांनी केलेले व्यसनमुक्तीचे कार्य, ’ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी’चे प्रकाशन, दुधिवरे (लोणावळा) येथे निर्माण केलेले ’भक्तिधाम’ ही त्यांची ऐतिहासिक कार्ये आहेत. वारकरी संप्रदायाच्या कार्यात अर्वाचीन काळात वै. विष्णुपंत जोगमहाराज, हभप प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामा, हभप धुंडामहाराज देगलूरकर, हभप अप्पासाहेब वासकर, साखरेमहाराज यांच्याप्रमाणेच बाबामहाराज सातारकर या नाममुद्रेची नोंद मोठ्या आदरभावाने केली जाईल.
बालपणीच सर्वज्ञता
थोर भागवतभक्त व सातारकर फडाचे संस्थापक वै. दादामहाराज सातारकर यांचे बाबामहाराज नातू होते. एका थोर सत्पुरुषाच्या वारकरी घराण्यात जन्मल्याचा बाबामहाराजांना अभिमान होता. कोणी कोठे जन्म घ्यावा, हे माणसाच्या हाती नसते. पण, अशा पुण्यवान घराण्यात जन्म एक भाग्यच होते. सातारा येथील बुधवार पेठेतील वाड्यात दि. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी बाबामहाराज यांचा जन्म झाला. आजोबांनी (दादामहाराज) जगद्गुरू तुकोबांचे शिष्य संत निळोबा यांच्या नावावरून आपल्या नातवाचे नाव ’निलकंठ’ ठेवले. (निलकंठ ज्ञानेश्वर गोर्हे उर्फ बाबामहाराज). त्यांचे सर्व शिक्षण मुंबईत इंग्रजी शाळेत झाले. घरातच त्यांना विठ्ठलभक्तीचे बाळकडू व सकल संतांच्या बोधामृताचे संस्कार लाभले. थोर कीर्तनकार आजोबा (दादामहाराज) आणि थोर निरूपणकार अप्पामहाराज (काका) यांच्या सहवासात व सत्संगात बाबामहाराजांना बालपणीच ‘ज्ञानेश्वरी’, ‘नाथभागवत’, ‘तुकाराम गाथा’ या संतवाणीचे वाचन, अध्ययन, पारायण करण्याचा योग लाभला आणि वयाच्या केवळ दहाव्या वर्षी बाबामहाराजांनी पहिले कीर्तन केले.
आजोबा व काकांनी त्यांच्यावर विशेष प्रेम करीत, त्यांना चतुरस्र संस्काराने घडवले. बाबामहाराजांना शास्त्रीय गायन शिकवण्यास थोर गायक हुसेन खाँ त्यांच्या घरी येत होते. त्यामुळे बालपणीच शास्त्रीय गायनाची गोडी त्यांना लागली व निसर्गदत्त सुरेल आवाजाला शास्त्राचे अधिष्ठान मिळाले. वयाच्या ११व्या वर्षी बाबामहाराज यांचा मुंबई आकाशवाणी केंद्रामध्ये गाण्याचा कार्यक्रम झाला. अशी बालपणीच त्यांना अनेक विषयांत सर्वज्ञता प्राप्त झालेली होती.
'
परमार्थाची निवड
शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ बाबामहाराज यांनी त्यांच्या काकांसमवेत मुंबईत फर्निचरचा व्यवसाय-व्यापार केला. पण, १९५६ साली त्यांच्या पुढे उद्योग-व्यापार करायचा की घराण्यात चालत आलेली विठ्ठलभक्ती सेवा-परंपरा, असा प्रश्न निर्माण झाला. बाबामहाराजांनी सहजपणे हसतहसत उद्योग-व्यापारास तिलांजली दिली आणि घराण्याची वारकरी फड परंपरा-भक्तिसेवा करण्याचे व्रत अंगीकारले. ’पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक व्रत मी न करी।’ म्हणत पंढरीची वारी, विठ्ठलभक्ती, भजन कीर्तन, प्रवचन हेच आपले विहित जीवनकार्य व कर्तव्य मानले. हेच त्यांचे मोठेपण व वेगळेपण होते.
दरम्यान, १९५४ साली बाबामहाराजांचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा झाला. पंढरीच्या वारीतील देशमुख दिंडीतील वीणेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गा जाधव हिच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुली (नियती उर्फ भगवती आणि रासेश्वरी) आणि एक मुलगा (चैतन्य) झाला. संत एकनाथ महाराजांप्रमाणे बाबामहाराज यांचा प्रपंच परमार्थरूप, ’आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा आनंदरूप झाला. धर्मपरायण पत्नी व कन्या-पुत्राचे सौख्य त्यांना लाभले. पुढे ऐन तरूण वयात मुलगा चैतन्य याच्या अकाली, अपघाती मृत्यूचे दुःख त्यांना सोसावे लागले. ते त्यांनी स्थितप्रज्ञ मनाने भोगले.
’सातारकर फड’ प्रमुखपदाचे दायित्व
वारकरी संप्रदायाच्या इतिहासात वारकरी फड परंपरेचे योगदान फार मोठे आहे. या फड व्यवस्थेमुळेच वारकरी संप्रदायाचे संघटन सुदृढ व संवर्धित झालेले आहे. ‘नामदेवमहाराज फड’, ’देहुकरांचा फड’, ’वासकर फड’ यांना फड परंपरेतील तीन मुख्य फड मानले जाते. ‘सातारकर फड’ हा वासकर फड परंपरेतील एक शाखा आहे. हभप दादामहाराज सातारकर यांनी स्वतंत्र ‘सातारकर फडा’ची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील थोर संत श्रीकृष्णमहाराज गारवडेकर यांची दादामहाराज सातारकरांवर विशेष कृपा होती. त्यांनीच दादामहाराजांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले.
वै. दादामहाराज सातारकर यांचे वारकरी समाजातील स्थान अद्वितीय आहे. १९४० पासून दादामहाराज सातारा सोडून मुंबईत स्थायिक झालेले होते. त्यांचे दर्शन व वाणी म्हणजे साक्षात ज्ञान-भक्तीचे सगुणरूप होते. ’ते चालते ज्ञानाचे बिंब।’ अशी त्यांची ख्याती होती. बॅरिस्टर धुरंधर, बॅ. मेहंदळे, बॅरिस्टर परांजपे, न्यायमूर्ती हट्टंगडी हे व असे समाजातील थोर विद्वान, मान्यवर वै. दादामहाराजांचे भक्त व श्रोते होते. १९४६ साली त्यांनी देह विठ्ठलचरणी ठेवला. त्यानंतर दादामहाराजांचे पुत्र आप्पामहाराज यांनी ‘सातारकर फडा’ची व घराण्यातील वारीची धुरा सांभाळली. ते श्रीमद्भागवता चिंतक होते. त्यांचे भागवत ऐकण्यास अनेक मुंबईकर विद्वान मंडळी जमत होती. १९६२ मध्ये आप्पामहाराजांचे निधन झाले आणि ‘सातारकर फडा’ची जबाबदारी-दायित्व बाबामहाराज यांच्या खांद्यावर आले. ते दायित्व त्यांनी ६० वर्षे समर्थपणे भूषवित ‘सातारकर फडा’चाच नव्हे, तर वारकरी संप्रदायाची धर्मध्वजा सातासमुद्रापलीकडे पाश्चात्य देशातही डौलाने फडकविली. ’हरिभजने धवळले विश्व।’ असे अपूर्व कार्य केले.
असा कीर्तनकार होणे नाही...
गानसम्राट बालगंधर्व गेले तेव्हा ’असा बालगंधर्व पुन्हा नाही होणे’ असे एक संस्मरणीय काव्य गदिमांनी केले होते. बाबामहाराजांचे निधनवृत्त ऐकल्यावर हजारो लोकांची पहिली प्रतिक्रिया अशीच होती, ’असा कीर्तनकार आता होणे नाही...’ संत ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतल्यावर जी शोकाकुल स्थिती संत निवृत्तीनाथ, संत नामदेव आदी संतमंडळींची झाली, तशीच अवस्था समस्त वारकरी समाजाची बाबामहाराज गेल्याने झाली आहे. प्रत्येकजण त्याने ऐकलेल्या, बाबामहाराजांच्या कीर्तनाच्या आठवणीत हरवला आहे. बाबामहाराजांचे कीर्तन समोर बसून ऐकणे, हा श्रुतीमनोहर सोहळा असे. त्यांचे प्रसन्न दर्शन, त्यांचे गायन, त्यांचे निरूपण सारेच विलक्षण व अत्यंत प्रभावी होते. संत एकनाथ महाराजांनी ’सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी।’ या अभंगात कीर्तन महिमा आणि कीर्तन मर्यादा सांगितलेली आहे. बाबामहाराजांचे कीर्तन त्या अभंगाचा वस्तुपाठच होता. त्यांचे कीर्तन-निरूपण क्लिष्ट नव्हते. गीता जशी ज्ञानेश्वर माऊलींनी आबालवृद्धांना समजेल, अशी सुलभ व रसिकतेने सांगितली. तसेच बाबामहाराज संतांच्या अभंगाचे अत्यंत सोप्या भाषेत, छोट्या-छोट्या उदाहरणांनी निरूपण करीत संतांनी संस्कृतातील अवघड, क्लिष्ट धर्मविचार सुलभपणे समजेल, अशा भाषेत सांगितला, तर मग मी पुन्हा त्या अभंगांना वेदांत सांगून अवघड करणार नाही, असे बाबामहाराज म्हणत असत. त्यांची कीर्तने ’वाचे बरवे कवित्व। कवित्वी बरवे रसिकत्व। रसिकत्वी पर तत्त्वस्पर्श।’ अशा कोटीतील प्रेमबोधाचे रसाळ निरूपण असे. त्यात वारकरी भजन, सगुणकथा आणि प्रेमबोध याचा उत्कट प्रत्ययकारी मिलाप होता. संतांच्या प्रेमबोधाचा असा रसाळ, प्रभावी निरूपणकार-कीर्तनकार होणे नाही. काही समीक्षक, अभ्यासक तर बाबामहाराजांच्या कीर्तनाचे वर्णन ’एकपात्री संगीत नाटकाचा प्रयोग’ अशी स्तुतीसुमने उधळून करीत होते. संतवाणीद्वारे सांगायचे तर बाबामहाराज म्हणजे ’नादब्रह्म मुसावले’ असे होते.
बाबामहाराजांचे कीर्तन म्हणजे जसे सुरेल, भक्तिभावाचे गायन-भजन होते, तसेच ते समाजातील अंधश्रद्धा, भेदाभेद, कूप्रथा आणि व्यसनाधिनता यांवर जोरदार प्रहार होते. लोकप्रबोधनाचे त्यांच्या कीर्तनाने केलेले कार्य अपूर्व आहे. शेकडो गावातील, हजारो लोकांना तुळशीची माळ घालून त्यांनी व्यसनमुक्त केले आहे. त्यांच्या कीर्तनाचे व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये झालेले आयोजन, मठ, मंदिरातील कीर्तनाला एक नवा आयाम देणारे होते. बाबामहाराज असे समाजसन्मुख क्रीयाशील समाज प्रबोधक होते.
’दूरदर्शन’चे विशेष प्रेम
आकाशवाणी-दूरदर्शन ही लोकरंजना प्रमाणेच लोकप्रबोधनाचीही प्रसारमाध्यमे मानली जातात. संतांचा कृपांकित आणि संतबोध प्रवक्ता म्हणून या माध्यमांनी बाबामहाराजांना वेळोवेळी पाचारण केले. दूरदर्शनच्या प्रारंभीच्या अप्रुप काळात १९८३ साली मा. अशोक रानडे यांनी ’प्रतिभा आणि प्रतिमा’ या त्यावेळीच्या प्रचंड गाजलेल्या कार्यक्रम मालिकेत बाबामहाराजांची ’वारकरी कीर्तन’ यावर मुलाखत घेतली होती. ती खूपच लोकप्रिय ठरली. त्यानंतर दूरदर्शनवरच १९८६ डॉ. प्र. न. जोशी यांनी बाबामहाराजांची ’भक्ती आणि वैराग्य’ विषयावर प्रदीर्घ मुलाखत घेतली. पुढे १९९० मध्ये ज्ञानेश्वर सप्तजन्म शताब्दी देशभर साजरी होत असताना, दूरदर्शनने बाबामहाराजांची ’कैवल्याचा पुतळा’ नावाची अनेक भागांची मालिका प्रसारित केली. ज्ञानदेव, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यांचे साग्रसंगीत गायन आणि निरूपण अशा स्वरुपाची ती मालिकाही महाराष्ट्रात घरोघर मोठ्या भक्तिभावाने पाहिली गेली. १९९३ साली दिवाळीत बाबामहाराजांचा ’संतांची ज्ञानभक्तीची दिवाळी’ असा कार्यक्रम दूरदर्शनने केला. १९९४ मध्ये ’सुप्रभात’ नावाची मालिका प्रसारित झाली, तर १९९५ मध्ये संत एकनाथांच्या वाड्.मयाचे बाबामहाराजांनी १२ भागांतून सुंदर उद्बोधन केले.
एक काळ (कॅसेट) ध्वनिफितीचा होता. तेव्हा सर्वप्रथम हरिकीर्तनाची कॅसेट, बाबामहाराज यांच्याच कीर्तनाची निघाली होती. त्यांच्या कीर्तन-भजनांच्या कॅसेट विक्रीने खपाचे उच्चांक, विक्रम स्थापित केले होते. ’आम्ही दैवाचे दैवाचे’ या नावाची संतनामदेवांवरील कीर्तनाची त्यांची कॅसेट आणि ‘ज्ञानदेव विरहिणीची’ भजनाची कॅसेट आजही (कॅसेटचा जमाना इतिहास जमा झाला तरी) भाविकांच्या घराघरात श्रद्धापूर्वक ठेवलेल्या दिसतात. आता जमाना युट्यूबचा, सोशल मीडियाचा आहे. त्यातही बाबामहाराजांच्याच कीर्तनाचाच बोलबाला आहे.
’ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी’ प्रकाशन
बाबामहाराजांनी पाश्चात्य देशात भ्रमण केले, तेव्हा तेथील धर्मग्रंथांच्या राजेशाही थाटाच्या प्रती पाहून, त्यांना ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकोबांचा अभंगगाथा अशा राजेशाही थाटाच्या पुस्तक रुपात छापून, प्रकाशित करण्याची कल्पला सूचली. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आमुची माऊली, त्या माऊलीला सर्वांगसुंदर रंगीत स्वरुपात म्हणजे पैठणी, शालू नेसवून प्रकाशित करण्याचा प्रकल्प बाबामहाराजांनी हाती घेतला आणि चिकाटीने पूर्ण केला ’ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी’ प्रकाशन सोहळा हे बाबामहाराजांच्या सांप्रदायिक भक्ती कार्याचा कळस आहे. ‘ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी’ म्हणजे ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे चित्ररूप दर्शन, सुंदर-सुंदर चित्रांद्वारे ज्ञानदेवांच्या विचाराचे दृश्यरूप नयनरम्य दर्शन ‘ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी’द्वारे घडते. दि. ९ जुलै १९९५ रोजी आषाढी एकादशीच्या महापर्वकाळी त्यावेळीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते ‘ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी’चा भव्यदिव्य प्रकाशन सोहळा झाला. या कार्यपूर्तीने बाबामहाराज व त्यांची ’चैतन्य भागवत संप्रदाय प्रचार संस्था’ धन्य-धन्य झाली. ’कृतकृत्य झालो। इच्छा केली ते पावलो।’ असे कार्य बाबामहाराजांच्या हातून झाले, ही त्यांच्यावरील संतकृपेचेच दर्शन होय!
मान-सन्मान व पुरस्कार
बाबामहाराज कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते तसेच व्याख्याते म्हणूनही लोकप्रिय होते. अनेक साहित्य संमेलने, चर्चासत्रे, परिसंवाद यांमध्ये त्यांनी संत साहित्याचे प्रवक्ते म्हणून समयानुकूल विचारांची सूत्रबद्ध मांडणी केली व ‘संतवाणी’ विषयाचे लोकातील अपसमज, अज्ञान दूर केले. सातारचे मराठी साहित्य संमेलन, मुंबईतील ‘चतुरंग’ने केलेले कार्यक्रम, पुण्यातील ‘वसंत व्याख्यानमाला’ बाबामहाराजांच्या विद्वत्तापूर्ण व्याख्यानाच्या साक्षी आहेत. बाबामहाराजांना महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. पुण्यातील सारसबागमधील देवदेवेश्वर संस्थानचा ‘श्रीमंत नानासाहेब पेशवे आध्यात्मिक पुरस्कार’ पुणे महापालिकेचे मानपत्र, पुणे विद्यापीठाचा सन्मान, महाराष्ट्र शासनाचे सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी बाबामहाराजांचा कार्यगौरव करण्यात धन्यता मानली. “हे सन्मान माझे नसून मी ज्या संतांचा, संत विचारांचा पाईक व प्रवक्ता आहे, त्या संतांचा-संतसाहित्याचा सन्मान आहे,“ असे बाबामहाराज वारंवार म्हणत होते.
मी १९८२ साली पूर्वांचलमधील नागालॅण्ड-मणिपूरमधून वनवासी कल्याण आश्रम कार्यातून थांबल्यावर ‘पुणे तरुण भारत’ दैनिकात उपसंपादक म्हणून कार्यरत झालो, तेव्हा आळंदी ते पंढरी पालखी सोहळ्याचे दैनंदिन वार्तांकन करण्यास दिवसभर पालखी सोहळ्यात चालत असे. तेथे बाबामहाराज यांची माझी भेट झाली, स्नेहबंध जुळले. सलग आठ-दहा वर्षे पायीवारीतील सहवासात वृद्धिंगत झाले. दूरदर्शनवर ’कैवल्याचा पुतळा’ मालिका स्टुडिओत चित्रित होताना अनेक मान्यवरांमध्ये मीसुद्धा होतो. डॉ. अशोक कामत, पुणे विद्यापीठ, नामदेव अध्यासन प्रमुख असताना त्यांचा सहकारी, स्नेही म्हणून मला बाबामहाराज यांचा अध्यासनात कार्यक्रम घडवून आणण्याचे भाग्य लाभले होते.
पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी वारकरी कीर्तन दर्शन घडवण्यासाठी सारसबाग गणेश मंदिरात बाबामहाराजांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यातही मला सहभाग लाभला होता. दिवाळी पाडव्याला आलेली बाबामहाराजांची सुवाच्य सुंदर अनेक शुभेच्छा पत्रे माझ्या संग्रही आहेत. तो माझी नीजधन ठेवा आहे. ‘बाबामहाराजांचे पुण्यस्मरण’ हा खरं तर ग्रंथाचाच प्रदीर्घ विषय आहे. या छोट्या स्मृतिलेखात काय लिहू आणि काय नको, अशी माझी अवस्था आहे. बाबामहाराजांचे एका अभंगात वर्णन करायचे, तर संत एकनाथांनी संतशिरोमणी ज्ञानदेवांविषयी व्यक्त केलेला अभंगभाव मला अधिक सार्थ व समर्पक वाटतो. ’कैवल्याचा पुतळा’, ’साधकांचा मायबाप’, ’चैतन्याचा जिव्हाळा’, ’चिंतकांचा चिंतामणी’ आणि ’विठोबाचा प्राणसखा’ ही सारी विशेषणे बाबामहाराजांच्या अमृतजीवनाला सुवर्णालंकारासम साजरी ठरणारी आहेत.
विद्याधर ताठे (पाटील)
(लेखक संत साहित्याचे उपासक, अभ्यासक आहेत.)
९८८१९०९७७५
vidyadhartathe@gmail.com