मुंबई : कतारमधील न्यायालयाने भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कतारमधील एका कंपनीत काम करणाऱ्या ८ अधिकाऱ्यांना २०२२ मध्ये तेथील सरकारने हेरगिरीचा आरोप करत अटक केली होती. त्यानंतर आता गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (ADGTCS) नावाच्या कंपनीसाठी हे सर्व माजी अधिकारी काम करत होते. कतार सरकारने त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप केला होता. मात्र, हे आरोप पुर्णपणे खोटे असल्याचे या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. कतारच्या या निर्णयाचे भारताला आश्चर्य वाटत असून या अधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी सर्व कायदेशीर मदत देणार आहे. तसेच या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आमच्यासाठी हे प्रकरण खूप महत्त्वाचे असून आम्ही त्याचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
कतारमध्ये कथित हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. हे सर्वजण कथित हेरगिरीच्या आरोपाखाली ऑगस्ट २०२२ पासून कतारच्या तुरुंगात आहेत. परंतु, या आरोपांबद्दल कतारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये माजी नौदल अधिकारी कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश यांचा समावेश आहे.